पुणे जिल्हा: धोम-बलकवडी आवर्तनाची प्रतीक्षा

नेरे (ता. भोर) : धोम – बलकवडी धरणाच्या उजवा उजव्या कालवा पाण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे.
वीसगाव खोरे – भोर तालुक्यातील वीसगाव खो-यातील रब्बी हंगामातील पिके पाण्या अभावी सुकू लागली आहेत. धोम – बलकवडी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. भोरच्या दक्षिण भागातील चाळीसगाव, वीसगाव खोऱ्यातून पूर्वेकडे गेलेल्या धोम -बलकवडी उजवा कालवा मागील दोन-तीन महिन्यांपासून कोरडा ठणठणीत पडला आहे.परिणामी रब्बी पिके कालव्याच्या पाण्याअभावी सुकून चालल्याने कालव्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
वीसगावच्या नेरे, खानापूर, उत्रौली, कान्हवडी तसेच चाळीसगाव खोऱ्यातील आंबवडे परिसरातील शेतकऱ्यांची धोम – बलकवडी उजव्या कालव्याच्या आवर्तनावरती दरवर्षी रब्बी पिके अवलंबून असतात.मात्र यंदा रब्बीतील ज्वारी, हरभरा,गहू,करडई पिके सुरुवातीच्या काळात जोमात आली होती.सध्या मागील पंधरा दिवसांपासून पिकांना पाण्याची आवश्यकता असतानाही कालव्याला आवर्तन सोडले गेले नसल्याने पिके सुकून चालली आहेत.शेतकरी वर्ग पिकांचे हाल पाहून चिंताग्रस्त झाला आहे.
रब्बी पिकांना पाणी मिळाले तर रब्बी पिके ही जोमात येऊन उत्पन्नात वाढ होणार असल्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. धोम -बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला पहिले आवर्तन सोडले तर रब्बीतील पिकांना फायदा होण्याबरोबरच कालव्याच्या खालील भागातील ओढे -नाले तसेच विहिरींना पाण्याचे स्त्रोत वाढणार आहेत. लवकरात लवकर कालव्याचे पहिले आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पाणी मागणी अर्ज करा
वीसगाव,चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज धोम-बलकवडी उजव्या कालव्याच्या खात्याकडे करावा. पाणी मागणीनुसार वरिष्ठ कार्यालयाकडे लवकरच माहिती कळवली जाईल. कालवा सल्लागार बैठकीत याचा निर्णय घेऊनच कालव्याला पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाते, असे कनिष्ठ अभियंता स्वप्निल बोरसे यांनी सांगितले.





