पुणे जिल्हा : रांजणगावमधील ‘त्या’ कंपनीच्या विरोधात परिसरातील गावांच्या ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

रांजणगाव गणपती : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या प्रदूषणाविषयी व वाढीव क्षेत्र रद्द करण्यासंदर्भात सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी निमगाव भोगी, शिरूर ग्रामीण, अण्णापुर, कर्डेलवाडी, सरसवाडी, ढोकसांगवी, आमदाबाद या ग्रामस्थांच्या वतीने बुधवार दिनांक २८ऑगस्ट रोजी रांजणगाव गणपती मंदिरासमोर पुणे नगर महामार्गावरती रास्ता रोको करण्याचा इशारा पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी दिला आहे.
निमगाव भोगी येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपामध्ये कंपनीच्या प्रदूषणा विषयी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, पंचायत समिती सदस्य आबा सरोदे, शिरूर आंबेगाव काँग्रेस चे अध्यक्ष यशवंत पाचंगे, नगरसेवक विठ्ठल पवार,दादा पाटील घावटे आजूबाजूचे पंचक्रोशीतील सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते तसेच निमगाव भोगी गावातील आजी माजी सरपंच,उपसरपंच, चेअरमन व सर्व सदस्य, महिला भगिनी उपस्थित होते.
यामध्ये २८ तारखेला सकाळी ९ वाजता रांजणगाव येथील महागणपती मंदिराजवळ पुणे नगर महामार्गावरती रास्ता रोको करण्याचे ठरले आहे. याबाबत लवकरच सर्व सरकारी विभागांना निवेदने देण्यात येणार असल्याचे निमगाव भोगी गावच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





