पुणे जिल्हा : ग्यान ज्योतमध्ये विविध योगासने सादर

आळंदी – येथील मुक्ता देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूलमध्येे जागतिक योग दिन सकाळच्या आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या शिक्षिका लहाने मॅडम यांनी योगासनाचे महत्त्व व फायदे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. त्यानंतर सूर्यनमस्काराने योगासनाला सुरुवात करण्यात आली.
तसेच वृक्षासन, पद्मासन, त्रिकोणासन, वज्रासन असे विविध योगासने घेण्यात आली. त्यानंतर इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांनी गाण्यावर योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले.
यावेळी प्रशालेचे संस्थापक राजेंद्र घुंडरे, संचालिका किर्ती घुंडरे, प्रशालेचे व्यवस्थापक विजय धादवड, प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर, अक्षय चपटे यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनीही योगासनाचा आनंद घेतला.





