पुणे जिल्हा : …तोपर्यंत कामठावाडीतील चारा छावणी सुरू राहणार

शरद पवार : भारतीय जैन संघटनेने सुरू केलेल्या चारा छावणीला दिली भेट
वाल्हे – भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मागील महिन्यांपासून वाल्हे जवळील भुजबळ कामठवाडी (ता. पुरंदर) येथे जनावरांची चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. ही चारा छावणी, मुबलक प्रमाणात पाऊस, तसेच विहिरीची पाणीपातळी जोपर्यंत वाढत नाही; तोपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी देताच, पशुपालकांनी आनंद व्यक्त करीत, सुस्कार टाकला.
शरद पवार यांचा दुष्काळी परिस्थितीची पाहणी दौरा व शेतकर्यांशी संवाद दौरा बुधवार (दि.12) पुरंदर तालुक्यातील वाल्हे, कोळविहिरे आदी गावात आयोजित करण्यात आला होता. यावेळी,वाल्हे येथील जनावरांच्या छावणीस भेट देऊन,पाहणी करतानाच, अनेक पशुपालकांनी पशुधन सद्यःस्थितीत जगविण्याच्या अडचणींचा पाहा वाचला, त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.
यावेळी शरद पवार यांनी परिसरातील पावसाची, शेतकर्यांची आस्थाने चौकशी करत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी, भारतीय जैन संघटनेचे रमेश नवलाखा, अशोक पवार, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, सुदाम इंगळे, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, दत्ता चव्हाण, नितीन शहा, शिरीष शहा, सर्कल बापूसाहेब देवकर, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भुजबळ, तानाजी पवार, तानाजी भुजबळ, राजेंद्र पवार आदींसह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, पशुपालक उपस्थित होते.
पवार, म्हणाले की, पुरंदर तालुक्यात जैन संघटनेने वेळो-वेळी मोठे योगदान दिले असून, अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये भारतीय जैन संघटनेने आपले दातृत्व दाखवून दिले असल्याचे नमूद केले. 2013 मध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतः शरद पवार यांनी दिल्लीवरून शांतिलाल मुथा, सतीश मगर आदींना फोन करून तातडीने पुरंदर तालुक्यामध्ये चारा छावणी सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार वाल्हे, यमाई शिवरी, हरणी या ठिकाणी छावण्या सुरू केल्या; ही प्रेरणा जैन संघटनेला शरद पवार यांच्यामुळेच मिळाली असल्याचे, भारतीय जैन संघटनेचे रमेश नवलाखा यांनी सांगितले.
छावतणीत 380 जनावरे
वाल्हे येथील छावणीत सद्यःस्थितीत 380 जनावरे आहेत; या जनावरांना हिरवा चारा म्हणून, मका, ऊस प्रत्येक जनावरांस 16 किलो प्रमाणे देण्यात येत असून 1 किलो पशुखाद्य (सुग्रास) देण्यात येत आहे. जोपर्यंत पशुपालक छावणीत जनावरे ठेवतील तोपर्यंत येथील छावणी सुरू ठेवण्यात येईल; अशी माहिती भारती जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांच्या वतीने, व्यवस्थापक रमेश नवलाखा, अशोक पवार यांनी दिली.





