नारायणगाव पोलिसांकडून टोळी गजाआड : चार महिला, चार पुरुषांचा समावेश नारायणगाव – मुलाचे लग्न करणे आई वडिलांची मोठी समस्या बनली असून त्याचाच गैरफायदा घेऊन अविवाहित मुलांची फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. जुन्नर तालुक्यातील खोडद गावचे शरद तुकाराम गायकवाड यांच्याशी मुलीने खोटे लग्न करून आर्थिक फसवणूक केली असल्याची घटना नुकतीच घडली . तशी तक्रार त्यांनी नारायणगाव पोलिसांकडे केली होती. तक्रारीनंतर नारायणगाव पोलिसांनी खोटे लग्न करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणारी टोळी गजाआड केली आहे. यामध्ये आरोपी सुवर्णमाला सुरेश वाडकर (रा. छत्रपती संभाजीनगर), मनीषा अडसुळे (सिंहगड रोड, पुणे), संतोष सखाराम घोडे (पिंपळनेर, ता. देऊळगाव, जि. बुलडाणा), भारती दामोदर मोरे (डोणगाव इंदिरानगर, ता. मेहकर, जि. बुलढाणा), अश्विनी सागर जगदाळे (रा. पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे), सुनील काळे , पंकज डग (दोघे पंचतळे, शिरूर), नामदेव कोल्हे (जांबुत, ता. पारनेर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींची चौकशी केली असता वरील काही आरोपींनी युवकांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींनी मध्यस्थी करून लग्न लावून दिले बाबत ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचेकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. फसवणूक करणारी वधू महिला अश्विनी सागर जगदाळे हिस १६ वर्षाची मुलगी तर १४ वर्षाचा मुलगा आहे. महिलेने अशाच प्रकारे आजपर्यंत सहा ते सात तरुणांना सोबत लग्न करून फसवले आहे. पुण्यातील चार आरोपींनी न्यायालयीन कोठडी मिळाली असून तीन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील एका आरोपीस जेरबंद करणे बाकी आहे.आरोपींनी जुन्नर, पारनेर, शिरूर आदी ठिकाणी अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याची माहिती मिळून आली आहे. गुन्ह्यात २५ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील पुढील तपास करीत आहेत.