बारामती : बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत जागतिक दर्जाचे कृषिक प्रदर्शन (दि.१६) पासून सुरू होत आहे. उद्घाटनासाठी एकाच मंचावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहे. त्यामुळे काका- पुतणे यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रदर्शनातून काका- पुतणे हे कोणते सूचक वक्तव्य करणार काय, याची उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री तसेच क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे आदींनी प्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीत फूट पडल्यानंतर राजकीय भूकंप हादरवणारे होते. पहिल्यांदा शिवसेनेतील बंडाळी झाल्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादीला धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून आपल्या शिलेदारांना घेऊन ते महायुतीत सत्तेच्या सारीपाटावर विराजमान झाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीची फुटीरता पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांना जिव्हारी लागले आहे. पवार कुटुंबीयातील अभेद्य एकोप्यात फूट पडल्यानंतर कौटुंबिक पातळीवर वक्तव्य करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय पाहावयास मिळाला होता. काका- पुतण्यातील टोकाचा राजकीय संघर्ष हा उभ्या महाराष्ट्राने पाहिला होता. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार, अशी झाली. नणंद- भावजय यांच्यातील लढत ही देशपातळीवर लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर जागतिक पातळीवरील प्रसारमाध्यमाने लक्ष वेधले होते. लोकसभेत सुनेत्रा पवार यांचा पराभव हा अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. त्यावेळी अजित पवार यांनी उमेदवारी देणे ही चूक असल्याची कबुली त्यांनी जाहीर व्यासपीठावरून दिली होती. लोकसभेत अपयश आल्यानंतर अजित पवार गट हा बॅकफूटवर गेला होता. मात्र, विधानसभेत अजित पवार यांनी दमदार कामगिरी करत यश खेचून आणले. मनोमिलनाच्या घटना ताज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबीयासह शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता. त्यानंतर आशाताई पवार, सुनंदा पवार यांचे सूचक वक्तव्य चर्चेत आले होते. विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार गटातील आमदारांमध्ये काहीशी निराशा आली आहे. त्या पाश्र्वभूमीवर भेटीच्या घटनांतून राजकीय विश्लेषकांनी अर्थ घेतला होता. बीड प्रकरणावरून अजित पवार गट बॅकफूटवर गेला आहे. यावरून हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला आहे. शहा यांचे टीकास्त्र परतवले शिर्डी येथील भाजपच्या मेळाव्यात गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर दगाबाज, अशी टीका केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी मागील वेळेप्रमाणे यावेळी त्यांनी शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांनी अमित शहा यांचा खरपूस समाचार घेत हल्ला परतावून लावले आहे. कृषी धोरणावर सूचक संकेत देशात कृषी क्षेत्रातील स्थिती आणि शेतीमालाला मिळणारा बाजारभाव यावर शरद पवार हे सूचक वक्तव्य करण्याचे संकेत आहे. सध्या दिल्लीतील शेतकरी आंदोलन, कडधान्याला मिळणारा अल्पसा बाजारभाव, साखर कारखानदारी आदी घटकांचा परामर्श यावेळी घेतला जाण्याची शक्यता आहे.