पुणे जिल्हा : जुना पुणे-नाशिक रस्त्यावर टेम्पो उलटलेल्याने दोघे जखमी

मंचर : एकलहरे (ता. आंबेगाव) येथील जुना पुणे नाशिक महामार्गावर टेम्पो उलटल्याने टेम्पोमधील मंचरचे दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवार, दि. १ रोजी दुपारी घडली आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
एकलहरे जुने पुणे नाशिक महामार्गावर टेम्पो क्रमांक एम एच १४ जे एल ४२६४ हा मंचरच्या दिशेने जात असताना रस्त्याने जाणारी दुचाकी अचानक आडवी आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नांमध्ये टेम्पो समोर असलेल्या टेम्पो चासीला धडकून जागेवर उलटला. त्यामुळे एकूण तीन वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान दुचाकीस्वार आणि चासी चालक वाहनांसह दोघेही निघून गेल्याचे सांगण्यात आले.
जखमींमध्ये प्रशांत अशोक थोरात (वय २१, रा. मंचर, थोरातमळा) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. तर शेजारी बसलेला मित्र त्याचे शुभम सुभाष बागल (वय २६, बागलमळा) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. घटनास्थळी स्थानिक एकलहरे येथील युवकांनी टेम्पो सरळ करून जखमींना बाहेर काढले. पुढील उपचारासाठी जखमींना मंचर येथील खाजगी दवाखान्यामध्ये पाठवले आहे.
रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांनी रस्त्यावर अपघात पाहण्यासाठी गर्दी केली होती. या गर्दीतून कोणीतरी घटनेची माहिती रुग्णवाहिका चालक व मंचर पोलिसांना कळविल्यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. जखमींना उपचारासाठी मंचर येथे हलवण्यात आले आहे. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक राजेंद्र हिले आणि पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पटाडे यांनी भेट देऊन पंचनामा केल्याचे सांगण्यात आले.





