मंचर – पेठ (ता. आंबेगाव) येथे घरासमोर सांडपाण्याची चारी काढण्याच्या तसेच जमिनीच्या वादावरून दोन गटात कोयत्याने मारहाण झाली. या मारहाणीत 9 नागरिक जखमी झाले असून, दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादिनुसार 11 जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, ही घटना मंगळवारी (दि. 6) दुपारी दीडच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
सुरेश नाना उनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, नेटकेवस्ती येथे वामन नेटके, मंगेश नेटके, चेतन नेटके यांनी संगनमताने सांडपाणी आणि चारीच्या कारणावरुन चिडून जीवे मारण्याची धमकी दिली, चेतन नेटके यांनी संदेश (पूर्ण नाव नाही) याच्या पाठीवर काठीने, वामन नेटके यांनी अक्षय नेटके यांच्या डोक्यावर आणि अनिकेत नेटके यांच्या हातावर कोयत्याने मारहाण केली.
मंगेश नेटके यांनी सुरेश उनवणे यांच्या पाठीवर, दीपक नेटके यांच्या हातावर आणि छातीवर, संदेश याच्या बोटावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले करीत आहे.
मंगेश वामन नेटके यांनी फिर्यादित म्हटले आहे की, दीपक हनुमंत नेटके, सुनील हनुमंत नेटके, दादा सुनील नेटके, गुल्या सुनील नेटके, वंदना उनवणे, हनुमंत नेटके यांची पत्नी (पूर्ण नाव माहीत नाही), वंदना उनवणे हिचे पती, मुलगा (सर्व रा. पेठ-नेटके वस्ती) यांनी जमिनीच्या वादाच्या कारणावरून दीपक नेटके यांनी कोयत्याने मंगेश नेटके यांच्या उजव्या हातावर मारुन दुखापत केली.
मंगेश नेटके यांचा मुलगा चेतन हा सोडवण्यास आला असता सुनील नेटके याने मंगेश नेटके आणि मुलगा चेतन यांना पाइपने मारहाण केली. इतरांनी मंगेश नेटके यांचे वडील वामन, पत्नी रीना, मुलगी नंदिनी यांना मारहाण केली. मंगेश नेटके यांची गाडी फोडली आहे. पुढील तपास पोलीस जवान कैलास कड करीत आहेत.