पुणे जिल्हा : प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले

बारामतीतील घटना : मेन पायलट, प्रशिक्षणार्थी जखमी
बारामती/जळोची/डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील कटफळनजीक बारामतीतील विमान प्रशिक्षण संस्थेचे शिकाऊ विमान टेकऑफ घेतल्यानंतर कोसळले. यामध्ये मेन पायलट शक्ती सिंग आणि प्रशिक्षणार्थी एक, असे दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या तीन वर्षांत विमान कोसळळ्याची ही तिसरी घटना आहे.
बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. शिकाऊ विमान नक्की कशामुळे कोसळले, त्याची मात्र माहिती अद्याप मिळाली नाही.
कटफळ रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच हे विमान कोसळले आहे. यामध्ये मेन पायलट शक्ती सिंग आणि प्रशिक्षणार्थी जखमी झाले आहेत. विमान कोसळल्यानंतर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बारामती, इंदापुरातील तिसरी घटना
बारामतीत गेल्या काही वर्षांपासून विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहेत. बारामतीतील विमानतळाचा त्यासाठी वापर होतो. काही महिन्यांपूर्वीच इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळले होते. यावेळी विमानाचे नुकसान झाले होते, मात्र त्यातील महिला पायलट प्रशिक्षणार्थी बचावली होती. ती घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे. गेल्या तीन वर्षांत विमान कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.





