पुणे जिल्हा : वाघोलीत भोंग्याद्वारे वाहतूक नियंत्रण; संपत गाडेंची अभिनव संकल्पना

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाहक संपत गाडे यांच्या सहकार्याने भोंग्याद्वारे वाहतूक नियंत्रण केले जात आहे. यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास या भोंग्यांची मोलाची मदत होत आहे. सध्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाहक संपत गाडे यांनी भोंग्याद्वारे माइक वर अनाउन्समेंट करून वाहतूक नियंत्रण करण्याची संकल्पना लोणीकंद वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्यापुढे मांडली होती. गजानन जाधव यांची परवानगी घेतल्यानंतर हा उपक्रम स्वखर्चाने राबवून वाघोली येथील केसनंद फाटा चौकात भोंग्याद्वारे माइकवर पोलीस कर्मचारी सूचना देऊन वाहतूक नियंत्रण करू लागले आहेत याची माहिती गाडे यांनी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना दिली.
अप्पर पोलीस आयुक्तांनी देखील वाघोलीमध्ये चालू असलेल्या वाहतूक कोंडी मुक्तीसाठीच्या या उपक्रमाचे वाहतूक नियंत्रण समितीचे मुख्य कार्यवाहक संपत गाडे व लोणीकंद वाहतूक पोलिसांचे कौतुक केले आहे.
“वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना माइकद्वारे कळवून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी भोंग्याचा उपक्रम मोलाची कामगिरी करत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी मदत होत आहे. हा उपक्रम वाघोलीतील चौकाचौकांमध्ये राबवणार आहे.” – संपत गाडे, मुख्य कार्यवाहक, वाहतूक नियंत्रण समिती पुणे.





