अवजड वाहनांवर बंदीची मागणी ः सामाजिक संघटना आंदोलनाच्या तयारीत कल्पेश अ. भोई चाकण – महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे चाकण शहर आज वाहतूक कोंडीच्या भीषण समस्येला तोंड देत आहे. पुणे-नाशिक व तळेगाव-शिक्रापूर या मुख्य मार्गांवर वसलेल्या चाकणच्या छत्रपती शिवाजी महाराज (तळेगाव) चौकात दररोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी सामान्य जनतेच्या संयमाचा अंत पाहत आहे. या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक शहरात सकाळ-संध्याकाळ बंद ठेवावी अशी नागरिकांची मागणी प्रचंड जोर धरत असून आता सामाजिक संघटना संघर्षाची भूमिका घेत आहेत. दररोज सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळात चाकणचा मुख्य चौक अक्षरशः ठप्प होतो. रस्त्यावर कंटेनर, ट्रक, खाजगी बस, रिक्षा यांची गर्दी असह्य पातळीला पोचली आहे. कामावर जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनं अशा सर्वांनाच याचा फटका बसत आहे.ज्यांना वेळेवर ऑफिस, कॉलेज, इस्पितळात पोहोचायचंय, त्यांच्या नशिबावरच सगळं आहे! – असं म्हणत एका महिला प्रवाशाने रोष व्यक्त केला. अनेक वेळा वाहतूक नियंत्रित करण्यासाठी बैठका होऊनही त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 या वेळेत अवजड वाहनांवर बंदी असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, प्रत्यक्षात ही वाहने या वेळेतही मुक्तपणे शहरात प्रवेश करत आहेत. संपूर्ण नियम फक्त कागदावर आहेत, अंमलबजावणीचा पत्ता नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतो आहे. चाकण एमआयडीसीमध्ये गेल्या दशकात झपाट्याने वाढ झालेली औद्योगिक गुंतवणूक, कंपन्यांची संख्या, कर्मचारी वर्ग – या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे वाढलेली वाहतूक. मात्र त्यानुसार रस्ते विस्तारले नाहीत, वाहतूक नियोजन, पार्किंग झोन यांचा अभाव असल्याने कोंडीच्या संकटात शहर गुदमरू लागलं आहे. सामाजिक संस्थांनी सुचवलेले उपाय सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 9 या वेळेत कंटेनर, ट्रक आदी अवजड वाहनांवर बंदी रस्त्यावरील खासगी बसेसचे थांबे 100 मीटर पुढे हलवावेत चौकात उभ्या राहणार्या रिक्षा व वाहनांवर कारवाई वाहतूक पोलीस कर्मचारी संख्या वाढवणे मजूर अड्डा शहराबाहेर हलवणे रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवणे आता बस झाली चर्चांची, आम्ही रस्त्यावर उतरणारच, असा इशारा समितीचे प्रतिनिधी देत आहेत. बाह्यवळण रस्ता – आशेचा की फसवेगिरी मोशी ते चांडोली मार्गावरील नव्या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण असून काही तांत्रिक बाबींमुळे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू नाही. बाह्यवळण रस्ता हा चाकणच्या वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाय ठरू शकतो. परंतु त्या कामाची गती अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नांचे उत्तार हवे कंटेनर व अवजड वाहने बंदी असलेल्या वेळेत शहरात का प्रवेश करतात? वाहतूक नियमांची अंमलबजावणी का होत नाही? बाह्यवळण रस्त्याचे काम इतक्या वर्षांपासून रखडतेय, का? प्रशासनाला सामान्य नागरिकांचा त्रास दिसत नाही का? किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार?