बारामती : कृषक २०२५ या कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होईल. बारामती परिसरात शेतीचा तंत्रज्ञानाबरोबरच पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पवार म्हणाले की, यापूर्वी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे यापूर्वी आला होता. काही कारणामुळे ते झाले नाही. आता मात्र दर्जेदार पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करू. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून देईन, असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. कृषी अधिकाऱ्यांनी प्रदर्शन पाहावे पवार म्हणाले की, कृषी क्षेत्रात बदल करण्यासाठी राज्याबरोबरच केंद्राच्या कृषी विभागाची मदत घेणार असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले. संशोधन तंत्रज्ञानाचा वापर ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याकडे होत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे यंदाच्या कृषी प्रदर्शनाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. राज्याचे कृषी आयुक्त यांना कृषी प्रदर्शन पाहण्यास सांगणार असून जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांनी कृषी प्रदर्शन पहावे असे आदेश काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना केल्या.