Pune District : श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत चुरशीचे वातावरण

भवानीनगर : श्री छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची एकतर्फी वाटणारी निवडणूक बघता बघता चुरशीची झाली आहे. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांचे आता निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
श्री छत्रपती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री छत्रपती कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय पॅनल उभा करून सुरुवातीच्या काळात कारखान्याच्या परिसरातील विरोधाची हवा काढून घेतली होती. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय श्री जय भवानी माता पॅनल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच श्री छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, तानाजीराव थोरात व मुरलीधर निंबाळकर या विरोधकांनी एकत्र येत श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनल जाहीर केला.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक होत असताना श्री जय भवानी माता पॅनलने 21 जागांवर उमेदवार उभे केले परंतु श्री छत्रपती बचाव पॅनलला 21 जागांवर उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यांनी 15 जागांवरच उमेदवार उभा करून पॅनल उभा केला व निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात केली. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या दोन्ही पॅनलकडून फैरी झाडल्या जात आहेत. दोन्ही पॅनलकडून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावागावांमध्ये सभा घेऊन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दोन्ही पॅनलमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना अनेक सभासदांकडून कारखान्याच्या मागील दहा वर्षांमध्ये आलेल्या अडचणींचा पाढा वाचला जात आहे. दोन्ही पॅनलची नेतेमंडळी यामध्ये सुधारणा करण्याचे सभासदांना आश्वासन देत आहेत. दोन्ही पॅनलकडून सुरू असलेल्या जोरदार प्रचारामुळे निवडणुकीमध्ये चुरस वाढत चालली आहे.
येणार्या 18 मे रोजी मतदान रूपाने मतदार राजा (सभासद) ठरवतील की छत्रपती सहकारी साखर कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायचा. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी देखील उद्याच्या दिवसांमध्ये सभासदांपर्यंत पोहोचून मतदान करण्याची विनंती दोन्ही पॅनलकडून केली जाणार आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या तरी परिसरामध्ये मात्र छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चांना उधाण आले असून सर्व सभासदांचे लक्ष निवडणूक निकालाच्या म्हणजे 19 तारखेच्या दिवसासाठी लागून राहिले आहे.
19 मे रोजी निकाल
श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये चुरशीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सभासदांचे लक्ष आता निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे 18 मे रोजी मतदान होणारा असून 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे या निवडणुकीमध्ये कारखान्याचे सुमारे 22 हजार सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत.





