लोणी काळभोर : पुणे-सोलापूर लोहमार्गावरील लोणी काळभोर येथील रेल्वे स्थानकावरील तिकीट विक्रीची खिडकी वारंवार बंद रहात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना विनातिकीट असल्याने चेकरने पकडल्यानंतर दंड भरावा लागत आहे. रेल्वेचे ही आर्थिक नुकसान होत असल्याने रेल्वे प्रशासनाने या बाबतीत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 16 मे रोजी शुक्रवारी तिकीटविक्री खिडकी बंद असल्याने प्रवाशांना तिकिटाशिवाय प्रवास करावा लागला. नागरिकांनी रेल्वे अधिकार्यांना तिकीट खिडकी वारंवार बंद असण्याबाबत विचारणा केली असता, कंत्राटी कर्मचार्यांचा करार संपल्यामुळे ते कामावर आले नसल्याचे उडवाउडवीची उत्तरे प्रवाशांना देण्यात आली. तिकीट विक्री खिडकी बंद केल्याने प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. लोणी काळभोर रेल्वे स्थानक हे लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, कुंजीरवाडी आणि थेऊर यांसह आसपासच्या गावांतील प्रवाशांसाठी एक प्रमुख स्थानक आहे. अनेक प्रवासी कामासाठी पुणे आणि दौंड येथे जातात आणि या स्थानकावर प्रवास करणार्यांची संख्या अधिक असते. लोणी स्थानकावरून धावणार्या गाड्या दौंड- पुणे – दौंड, पुणे – दौंड – बारामती डेमू, पुणे – सोलापूर पॅसेंजर ट्रेनसह अनेक गाड्या लोणी स्थानकावरून धावतात. तथापि तिकीट काउंटर वारंवार बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून तिकिटाशिवाय प्रवास केल्याबद्दल दंड भरावा लागत आहे. गर्दीच्या वेळी तिकीट विक्री खिडकी बंद ठेवणार्या कर्मचार्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करत आहे. रेल्वे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि कर्तव्यात निष्काळजीपणा करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी विनंतीही प्रवाशांनी केली आहे. सात गाड्यांमधून विनातिकीट पव्रवास तिकीट विक्री खिडकी बंद असल्याची बाब प्रवाशांनी लोणी काळभोर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक अजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने वाणिज्य विभागाचा एक कर्मचारी लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर पाठवला. सकाळी 9:30 वाजता तिकीट विक्री खिडकी पुन्हा सुरू करण्यात आली. तथापि, बंद तिकीट विक्री खिडकीमुळे सकाळी साडेचार ते साडेनऊ दरम्यान डेमू, सोलापूर पॅसेंजर, बारामती डेमू, अशा एकूण 7 गाड्या विनातिकीट गेल्या असल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली.