पुणे जिल्हा : भोर तालुक्यातील पाच गावांना धोका

प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची आवश्यकता
डेहेण, सोनारवाडी, धानवली, जांभुळवाडी, कोंढरी गावे भीतीच्या छायेत
भोर – आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने भोर तालुक्यातील डेहेण, सोनारवाडी, धानवली, जांभुळवाडी, कोंढरी ही गावे डोंगर उतारावर असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती असून या गावांचे पुनर्वसन प्रस्ताव मंजुरीअभावी रखडले आहेत.
तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेहेण, सोनारवाडी, नीरा देवघर धरण भागातील धानवली व आंबवडे खोऱ्यातील जांभुळवाडी, हिरडस मावळ खोऱ्यातील कोंढरी गावांचा समावेश आहे. शासनाने अतिवृष्टीच्या छायेत असणाऱ्या या गावांना अल्पसा निधी मंजूर केला होता. यातून ओढे-नाले खोल व रुंद करून डोंगरावरून वाहणारे पाणी वळवणे, डोंगरदरडींना दगडी ताली बांधून जाळी लावणे, कॉंक्रिट व गॅबियन बंधारे अशी कामे करणे गरजेचे असताना अजूनही काही कामे अर्धवट आहेत.
नीरा देवघर धरणभागात रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागून धानवली हे 400 लोकवस्तीचे महादेव कोळी समाजाचे गाव असून, काही कुटुंबांचे डोंगरातून खाली दोन किलोमीटर सपाटावर पुनर्वसन केले आहे. मात्र, अजूनही काही कुटुंबे बाकी आहेत. अतिवृष्टीमध्ये डोंगरातील दगडमाती पडून घरांची पडझड होऊ शकते किंवा जीवितहानी होण्याची भीती आहे.
येथील लोकांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. अशीच स्थिती रायरेश्वर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोर्ले गावांतर्गत असलेल्या जांभुळवाडीची आहे. रायरेश्वराच्या डोंगराखाली ही 500 लोकवस्ती असलेली वाडी आहे. हिरडस मावळ खोऱ्यात अतिवृष्टीचा कोंढरी गावाला तीन वर्षापूर्वी भूस्खलन होऊन फटका बसला असताना या गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंजुरीअभावी शासन दरबारी रखडलेला आहे.
कोंढरीसाठी 13 कोटी 57 लाख
भोरपासून 25 किलोमीटर अंतरावर डोंगर उतारावर कोंढरी गाव वसले आहे. गावठाणाचे क्षेत्र 1 हेक्टर 17 गुंठे आहे. लोकसंख्या 319 असून 40 कुटुंबाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या गावाच्या भविष्यातील वाढीसाठी 2 हेक्टर 81 गुंठे जमीन लागणार आहे.
धानवलीसाठी 25 कोटी 47 लाख
भोरपासून 39 किलोमीटरवर रायरेश्वर पठाराजवळ दोन वस्त्यांमध्ये धानिवली वसले आहे. वरची व खालची धानवली मिळून 121 कुटुंब येथे राहतात. एकूण 458 लोकसंख्या आहे. या गावाच्या भविष्यातील वाढीसाठी 8 हेक्टर 76 गुंठे जमीन अपेक्षित आहे.
आमदार थोपटे यांचा विधानसभेत प्रश्न
इर्शाळवाडीतील घटना दुर्दैवी आहे. भोर मतदार संघातील धानवली, कोंढरी व मुळशी तालुक्यातील घुटके या गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात गेल्या आठ महिन्यापासून मंजुरीअभावी पडून आहेत. यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असूनही दुर्लक्ष केले जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यावर त्यांचे अश्रू पुसणे, त्यांना मदत जाहीर करणे, याची सरकार वाट पाहत आहे का? असा प्रश्न करून याला तत्काळ मान्यता देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे.
घुटकेसाठी 8 कोटी
मुळशीपासून 56 किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याशी घुटके गाव वसलेले आहे. 2019 च्या पावसाळ्यात डोंगरावरील माती व मुरूम वाहून आल्याने घरांना तडे पडले होते. येथे 219 लोकसंख्या असून, 46 कुटुंब वास्तव्याला आहेत.या गावाच्या भविष्यातील वाढीसाठी 2 हेक्टर 60 गुंठे जमीन अपेक्षित आहे.





