बारामती : शेती क्षेत्रातील कालबाह्य योजना बंद करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असून येणाऱ्या काळात कृषी क्षेत्रात बदल करणार असल्याची घोेणा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी २०२५ या कृषी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, कृषी क्षेत्रातील कारभारात पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार रोखण्याचे आवाहन देखील आहे. पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी होती. उत्पादनही कमी होते. सध्याची वाढती लोकसंख्या शेतमालाचा पुरवठा याचा ताळमेळ घालताना उत्पादन वाढीसाठी औषधे ही काळाची गरज झाली आहे. कर्जबाजारीपणा तसेच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची गरज निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढ शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान बांधासाठी पोर्टलची निर्मिती करणार कोकटे म्हणाले की, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र ही संस्थेद्वारे शेतकऱ्यांची उत्पादन वाढवण्याचे काम सुरू आहे. कृषी विज्ञान केंद्र ही संस्था राज्यातच नव्हे तर देशात नंबर एक संस्था असल्याचे सांगत कोकाटे यांनी संस्थेचे कौतुक केले. उत्पादन वाढीबरोबरच शेतमालाचे मार्केटिंग देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी शहरातील काही मोकळ्या जागा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या मालाचे मार्केटिंग करता येईल. शेतकऱ्यांना पिकांविषयी सखोल माहिती तसेच लागवडी संदर्भातील तंत्रज्ञान बांधावर मिळावे यासाठी एका पोर्टलची निर्मिती करणार आहे. लवकरच ते पोर्टल शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पीक विम्यात भ्रष्टाचार रोखता येऊ शकतात एक रुपयात पिक विमा यात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे दाखल झाल्या. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असून डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्यास अशा प्रकारचे भ्रष्टाचार रोखता येऊ शकतात असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे उदाहरण दिले.