पालखी सोहळाप्रमुखांच्या कृतीची परिसरात रंगली चर्चा नीरा – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नवनिर्वाचित प्रमुख योगी निरंजन नाथ यांच्यासह आळंदी संस्थानचे चोपदार यांचा गुरुवारी (दि. 13) तरडगाव ते सासवड असा पालखीस्थळ पाहणी दौरा होता; परंतु लोणंद येथून पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजन नाथ नीरामार्गे वाल्हेच्या दिशेने थेट गेले. पालखी सोहळ्यात माऊलींच्या नीरा स्नानाला अनन्यसाधारण महत्व असताना देखील नीरा स्नानाच्या स्थळाची व नीरा येथील पालखी विसावा स्थळाची पाहणी न करताच पुढे गेल्याने ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले, याची चर्चा चांगलीच सुरू होती. संत ज्ञानेश्वर महाराजंचा आषाढी पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात 2 ते 6 जुलै याकाळात चार दिवस मुक्कामी असणार आहे. त्या पार्श्वभुमीवर आळंदीच्या श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व पालखी सोहळा प्रमुखांनी नीरा येथील पालखी विसाव्याची पाहणी केली. नीरा येथील पालखी तळावर भाविकांना दर्शन रांगेची चोख व्यवस्था करण्यात यावी, संस्थानच्या घोड्याकरिता मंडपाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावा, पालखी तळावर वारकरी विसावा घेत असतात त्या ठिकाणी इतर व्यक्तींचा अडथळा नसावा. पालखी तळावर स्पिकरचा आवाज मर्यादित असावा. तसेच पालखी तळावर चांगल्या प्रमाणात स्वच्छता असावी, अशा सूचना चोपदार बाळासाहेब रणदिवे यांनी केल्या. …पण करवाई शुन्य गेली दोन वर्षापासून वाल्हे-लोणंद दरम्यानच्या नीरा शहाराबाहेरुन पालखी महामार्गाचे काम वेगात सुरू आहे. माऊलींचा पायी पालखी सोहळा व रथ जुन्याच मार्गाने जाणार आहे. यादरम्यान पिसुर्टी हद्दीत पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक आहे. या पाककलाऐवजी रेल्वे उड्डाणपूल बांधला जावा, अशी स्थानिकांसह वारकर्यांची मागणी आहे. पाहणी दौर्यावेळी याबाबत चर्चा केली जाते; पण करवाई शुन्य पहावयास मिळत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.