पुणे जिल्हा : विरोधकांच्या हाती मुद्देच नाही – अमोल मिटकरी

सणसर येथे आमदर भरणेंच्या प्रचारार्थ सभा
भवानीनगर – मी विदर्भात राहतो, जवळपास 32 विधानसभा मतदारसंघात शासनाचा तीन हजार कोटीचा निधी आला. यामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एका इंदापूर तालुक्यासाठी सहा हजार कोटी निधी आणला. आमचे 32 विधानसभा मतदारसंघ एकीकडे आणि इंदापूर विधानसभा एकीकडे हे अफलातून आहे. सर्व विरोधकांच्या हाती कोणताच मुद्दा नसल्यामुळे आपल्या परिवारातील ऑटो आणि गट्टू या पलीकडे कधी विकास गेला नाही, अशी टीका विधानपरिषदेचे आमदार अमोल मेटकरी यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील सणसर येथे शनिवारी (दि. 16) महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस)चे उमेदवार तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ सभेत मिटकरी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, हनुमंत कोकाटे, सणसर गावचे सरपंच पार्थ निंबाळकर, रणजित निंबाळकर, सचिन सपकळ, शिवानी सपकळ, मनोज पवार, शुभम निंबाळकर, मोहन सुरवाडकर, विक्रम निंबाळकर, शब्बीर सय्यद, वसंत जगताप, संजय निंबाळकर, विद्या गायकवाड,
तानाजी थोरात, रामचंद्र निंबाळकर, रामचंद्र जामदार, युवराज रणवरे, भाऊसाहेब सपकळ यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्थ निंबाळकर म्हणाले की, आमदार दत्तात्रय भरणे यांनी सणसर गावाला जवळपास शंभर कोटीच्यावर निधी विकासासाठी दिला. त्यामुळे रस्ते, गटारी व गावातील मूलभूत सुखसुविधा गावकर्यांना उपलब्ध झाले आहेत. आता सणसर गावकरी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मतदान देऊन तुम्हाला पुन्हा विधानसभेत पाठवू असा शब्द त्यांनी दिला.
सणसर भागातील इतक्या मोठ्या संख्येने महिला कधीही निवडणुकीतील सभेला दिसत नाहीत. मात्र आमदार दत्तात्रय भरणे यांनी जनतेसाठी केलेले काम व शासनाच्या माध्यमातून आपण तालुक्यातील महिला भगिनींना लाडक्या बहिणींना मिळवून दिलेला लाभ, ही शिदोरी तुमच्या पाठीशी असल्यामुळे, मामा,तुम्हाला लाडक्या बहिणी निवडून आणतील.
– वासुदेव काळे, जिल्हाध्यक्ष, भाजप





