पुणे जिल्हा : खडकी येथे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी

– अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान
मंचर – खडकी पिंपळगाव (ता. आंबेगाव) येथील पांढरी वस्ती येथे घोडनदीच्या बाजूला असलेल्या शेती पंपाच्या मोटारीच्या केबलची चोरी अज्ञात चोरट्याने केली आहे. सुमारे १५ ते २० शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांचे एकूण दीड ते दोन लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झाले आहे. गेल्या दीड महिन्यात तीन वेळा केबल चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी वैतागले आहे.
खडकी येथील पांढरी वस्तीवर पंधरा ते वीस शेतकऱ्यांचे घोड नदी किनाऱ्यावर शेती पंप असून नदीपात्रातून शेतीला पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाल्याने शेती पिकांना पाण्याची गरज नव्हती. त्यामुळे शेतकरी नदीकिनारी मोटर चालू करण्यासाठी येत नव्हता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात तीन वेळा केबल चोरीच्या घटना घडल्या होत्या.
बुधवार, दि.११ रोजी रात्री येथील शेतकरी अनिकेत राक्षे, संतोष पोखरकर, मंजाबा बांगर, गुलाब बांगर, दीपक बांगर, अनिकांत बांगर, विलास राक्षे, तानाजी राक्षे, अर्जुन बांगर, दशरथ बांगर, म्हतारबा बांगर, अर्जुन बांगर, महादु पोखरकर, अण्णा पोखरकर, मारुती पोखरकर, रामदास बांगर, दादाभाऊ बांगर, शंकर बांगर यासह इतर शेतकऱ्यांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी डीपी बॉक्स ते मोटारीपर्यंतच्या कट करुन चोरून नेले आहेत. या केबल तांब्याच्या असल्याने महागड्या आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दीड महिन्यात केबल चोरीच्या तीन वेळा घटना घडल्या आहेत.
पांढरी वस्ती येथे मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे, माळरान असल्याने त्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकरी तिकडे फिरकत नाहीत. व रात्रीच्या वेळी मोटारींची वीज गेली की त्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे केबल चोरी करत आहेत. केबल चोरांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा.
-अनिकेत रामदास राक्षे, शेतकरी, खडकी.
केबल चोऱ्यांत वाढ
शेती पंपाचा केबल चोरी जाण्याचे प्रमाण आंबेगाव तालुक्यात वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. केबल चोरीला जात असताना अनेक ठिकाणी शेतकरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज देत नसल्यामुळे पोलीस रेकॉर्डला चोरीची नोंद होत नाही .त्यामुळे केबल चोरांचे चांगलेच फावले आहे.





