पुणे जिल्हा : शेतात साठविलेला १५ ते २० गोणी कांद्याची चोरी

– एकलहरे येथे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
मंचर – एकलहरे (ता. आंबेगाव) येथील लोंढेमळा येथील शेतकरी प्रशांत प्रभाकर लोंढे यांच्या शेतातील कांदा बराकीतील साठविलेला कांद्यापैकी १५ ते २० गोणी कांदा पिशव्या भरून अज्ञात चोरट्यांनी शनिवार, दि.२० रोजी पहाटे चोरून नेला आहे. अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांचे संबंधित शेतकऱ्र्यांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी पहाटे अज्ञात चोरटे हे कांदा चोरण्यासाठी आले होते. परंतु गस्तीवरील तरुणांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला. त्या वेळेस ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. तसेच एकलहरे सर्कल चौकातील मोनिका सुनील भगत यांच्या पान टपरीवरील उसाच्या गुऱ्हाळाची १२ हजार रुपये किमतीची मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या संदर्भात त्यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. मंचर पोलीस पथकाने एकलहरे या ठिकाणी आपली गस्त वाढवावी.
जेणेकरून या अज्ञात भुरट्या चोरट्यांपासून शेतकरी वर्गाला सुटका मिळू शकते. कांदा चोरीला गेला तेथे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे, सुशील देठे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. वस्तीवर फिरणारे ड्रोन आणि रात्री अपरात्री येणारे चोरटे यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून वस्तीवरील तरुणांकडे गस्तीची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे, शिवसेना उपतालुकाप्रमुख माजी सरपंच संतोष डोके यांनी दिली.
कामगाराला कोंडून ठेवले…
कांदा चोरीची घटना घडत असताना मोठा आवाज झाल्याने शेतावरील कामगार अनिल पारधी हे जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या दरवाज्याला बाहेरून कड्या लावलेल्या असल्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या घटने संदर्भात फोन केला. परंतु आजूबाजूचे शेतकरी एकत्रित येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी तेथून कांदा पिशवी गाडीत टाकून पळ काढला होता.





