पुणे जिल्हा : विघ्नहर कारखान्यामुळे शेतकर्यांचे जीवनमान उंचावले

स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांकडून आठवणींना उजाळा
ओझर – स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी कारखाना उभारणीसाठी गावोगावी जाऊन शेअर्स गोळा केले. त्यावेळेच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संचालक मंडळासह तालुक्यात पायी दौरे करुन शेतकर्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित करुन तालुक्यात ऊसक्षेत्राची वाढ केली. सभासद, ऊस उत्पादकांना नेहमीच उच्चांकी ऊस बाजारभाव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावले. विघ्नहर कारखान्याच्या रुपाने शेठबाबांनी कामधेनू आणली. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन स्व. सोपानशेठ शेरकर यांनी कामकाज केले व विद्यमान चेअरमन सत्यशिल शेरकर हे हाच वसा घेवून पुढे कामकाज करत आहेत, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
श्री विघ्नहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांच्या 95 व्या जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी केले. शरद लेंडे, माऊली खंडागळे, संजय काळे, आशाताई बुचके, शरद सोनवणे या मान्यवरांनी विनम्र अभिवादन करुन शेठबाबांबद्दल विचार मांडले.
स्व. निवृत्तीशेठ शेरकर प्रतिष्ठानमार्फत जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये लहान गट 5वी ते 7वी मध्ये 31 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक कु. श्रीकला नवनाथ खेबडे, द्वितीय क्रमांक कु. कशिष दिपक वाधवाणी, तृतीय क्रमांक कु. अर्णव सुर्यकांत पोखरकर, उत्तेजनार्थ बक्षिस कु. ईश्वरी सुहास वर्पे यांना मिळाला. तसेच मोठा गट इयत्ता 8 वी ते 10 वीमध्ये एकूण 49 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आर्या संतोष पोटे, सई नितीन ससाणे, निवेदिता नितीन मुळुख यांनी पहिले तीन तर स्वरा संतोष पटाडे हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
महाविद्यालयीन गट इयत्ता 11 वी ते 15 वीमध्ये 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्रद्धा सुरेश अहिनवे, यशस्वी ज्ञानेश्वर पवार, समृध्दी संतोष मुंगसे यांनी पहिले तीन तर उत्तेजनार्थ बक्षिस साईराज मोहन घाटपांडे यांना मिळाले. वरील सर्व विद्यार्थ्यांना पी. एस. हांडे व व्ही. एम डुंबरे यांनी मार्गदर्शन केले. विजयी स्पर्धकांचा कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाच्या शुभहस्ते गुणगौरव व सत्कार करण्यात आला. व्हाइस चेअरमन अशोक घोलप यांनी आभार मानले.





