Pune District : टाळ मृदंगाच्या गजराने मांडकी दुमदुमले

समीर भुजबळ
वाल्हे –
व्यास आणि वाल्मिकी कोण कूळ त्यांचे ।
तैसेचि आमुचे सोपान म्हणे ॥
श्री संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी या गावांचे स्वागत स्वीकारीत मांडकी (ता.पुरंदर) येथे दुसर्या दिवसांच्या मुक्कामासाठी मंगळवारी (दि. 24) विसावला. यावेळी, टाळ-मृदंगाच्या तालावरती हातात भगवी पताका घेऊन ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोषात, अवघे मांडकी गाव दुमदुमले होते.यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बुधवारी (दि. 24) पालखी सोहळा निंबुतमध्ये मुक्कामी असणार आहे.
पालखी सोहळ्याचे मंगळवारी सायंकाळी सातच्या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी अंगावर झेलत,पुष्पवृष्टी करीत, पालखी सोहळ्याचे मांडकी गावात आगमन झाले.यावेळी,ग्रामस्थांच्या वतीने,रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांच्या व फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. दरम्यान,पारंपरिक ढोल-लेझीमच्या तालावर मांडकी येथील ग्रामस्थ व न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचा खेळ करीत पालखी सोहळ्याचे स्वागत केले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रूक्मिणी ची वेशभूषा तसेच विविध संताच्या वेषभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.
सायंकाळी साडेसात नंतर, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये पालखी विसावली. चोपदारांनी सूचना केल्यानंतर हजारो वैष्णवांच्या उपस्थित समाज आरती झाली.समाज आरतीनंतर रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दुतर्फा रांगा लावून सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. मान्यवरांनी हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करून विश्वस्त त्रिगुण गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी,चोपदार सिद्देश महाराज,चोपदार मनोहर महाराज रनवरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे,न्यू इंग्लिश स्कूल मांडकी येथील मुख्याध्यापक अरविंद भोसले,मांडकी ग्रामपंचायतीचे आजी- माजी सरपंच,उपसरपंच,आजी-माजी सदस्य, विविध सहकारी संस्थेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,संचालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.





