पुणे जिल्हा : डोर्लेवाडीची दोरी महिला सरपंचांच्या हाती

सुप्रिया नाळे यांचा मताधिक्याने विजय : जय हनुमान पॅनलला यश
डोर्लेवाडी – बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी जय हनुमान पॅनलच्या सुप्रिया मनोज नाळे यांनी मोठे मताधिक्य घेत विजय संपादन केला. यामध्ये जय हनुमान पॅनलने 15 पैकी 8 जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. विरोधी जय भवानी माता पॅनलला सात जागेवर विजय मिळवता आला. ग्रामपंचायतीचा कारभार महिलेच्या हाती आला आहे.
सरपंचपदासाठी जय हनुमान पॅनलच्या सरपंचपदासाठी नाळे, जय भवानीमाता पॅनलच्या ज्योती भोपळे, अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलच्या रोहिणी आटोळे, अपक्ष प्रभावती नाळे यांनी निवडणूक लढवलेली होती. यामध्ये सुप्रिया नाळे यांनी 1914 मते मिळवत विजयी संपादन केला.
जय हनुमान पॅनल आणि जय भवानी माता पॅनल यांच्यात सरळ लढत होत होती. मात्र या निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक जनसेवा पॅनलने अल्पसंख्यांक मतदाराची मोट बांधत सरपंचपदासह काही वॉर्डमध्ये उमेदवार उभे केल्याने दोन्ही पॅनलसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
जय हनुमान पॅनलचे विजयी उमेदवार – छबुबाई मदने, विश्वजीत घोडे, राणी नेवसे, रेखा नाळे, विद्या काळकुटे, राहुल भोपळे. बिनविरोध उमेदवार- सुमित्रा वामन, सुनील म्हेत्रे. जय भवानीमाता पॅनल – सचिन निलाखे, सोनाली नवले, प्रशांत जाधव, संदीप कुदळे. बिनविरोध उमेदवार- बीबी शिंदे, सोनाली शिंदे, राजेंद्र शिंदे.
आदर्श सरपंचांचा पराभव
डोर्लेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या मागील निवडणुकीत जय हनुमान पॅनलचे पांडुरंग सलवदे हे थेट जनतेतून सरपंचपदी निवडून आले होते.त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेसह विविध 5 खासगी संस्थांचे आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले होते. यावर्षी नव्या उमेदवारांना संधी देता यावी म्हणून पॅनलने त्यांना उमेदवारी नाकारली होती. तरीही सलवदे हे सदस्यपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. शेवटी जनतेनी त्यांचा पराभव केला. सलवदे यांना केवळ 168 मतांवर समाधान मानावे लागले. या पराभवाची चर्चा सर्व तालुक्यात होती.
“अल्पसंख्याक’ची झुंज
डोर्लेवाडी येथील निवडणुकीतील सरपंचपदाच्या उमेदवार रोहिणी आटोळे यांनी मागील 3 वर्षे गावात मोठ्या प्रमाणात सामजिक कार्यात सहभाग घेऊन विविध उपक्रम राबविले होते. अनेक शाळा व संस्थांना सामाजिक भावनेतून मदत केली होती. त्यांनी गावातील कोणाचेही राजकीय पाठबळ नसताना स्वाभिमानी अल्पसंख्यांक संघटनेच्या जनसेवा पॅनलच्या माध्यमातून या पारंपारिक दोन्ही पॅनलपुढे फार मोठे आव्हान उभे केले होते. दोन्ही पॅनलने उमेदवाराचा धसका घेतला होता. त्यानुसार फार मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण झाले. काही ठिकाणी मतदारांना दमबाजी देखील करण्यात आली. मात्र. तरीही या उमेदवाराने 1006 मते मिळवून वर्चस्व सिद्ध केले आहे.





