Pune District : संत ज्ञानेश्वर महाराजांचे मानाचे अश्व आळंदीत दाखल

अंकलीहून ३०० किमीचा पायी प्रवास पूर्ण; रिमझिम पावसात सनई-चौघड्यांनी स्वागत
आळंदी – टाळ-मृदंगाचा गजर आणि माऊली नामाचा जयघोष करत कर्नाटकातील अंकली येथून निघालेले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे दोन अश्व तब्बल अकरा दिवस पायी चालून आज, बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाच्या सरींमध्ये आळंदीत दाखल झाले.
अश्वांच्या आगमनाने भक्तीमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आळंदीकरांनी सनई-चौघड्यांनी त्यांचे स्वागत केले. आळंदी देवस्थानच्या वतीने विधिवत पूजन करत अश्वांचा सन्मान करण्यात आला. ३०० किमीचा पायी प्रवास अंकली (बेळगाव) येथून निघालेले हे मानाचे अश्व मिरज, इस्लामपूर, पेठनाका, वहागाव, भरतगाव, भुईंज, सारोळा, शिंदेवाडी आणि पुणे मार्गे तब्बल ३०० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून आळंदीत पोहोचले.
सायंकाळी चारनंतर आळंदीच्या जुन्या पुलापाशी, शहराच्या वेशीवर आल्यानंतर अश्वांनी बिडकर वाड्यात विश्रांती घेतली. यावेळी शितोळे सरकारांच्या वतीने अश्वांना निरोप देण्यात आला. परंपरेनुसार गुरू हैबतबाबांची दिंडी घेऊन अश्वांना सामोरे गेले आणि वेशीवर त्यांचा सन्मान करण्यात आला.
वाजत-गाजत स्वागत
वाजत-गाजत अश्व आळंदीत दाखल झाल्यानंतर कारंजे मंडपात आळंदी देवस्थानच्या वतीने नारळ अश्वावरील स्वारांना देण्यात आले. यानंतर अश्व विश्रांतीसाठी फुलवाले धर्मशाळेत दाखल झाले. या प्रसंगी उर्तिजसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे, सोहळाप्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बुवा, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, पालखी सोहळामालक ऋषिकेश आरफळकर, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील, योगेश आरु, राजाभाऊ चोपदार आणि ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी अश्वांच्या दर्शनासाठी वारकरी भाविकांनी फुलवाले धर्मशाळेत मोठी गर्दी केली होती. रिमझिम पावसातही भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा अव्याहत होती. या भक्तीमय सोहळ्याने आळंदी परिसर माऊली नामाच्या जयघोषाने दुमदुमला.





