राजगुरूनगरात बाबाजी काळेंकडून प्रश्नांचा भडीमार राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार (ठाकरे गट) बाबाजी काळे यांनी विरोधकांवर अनेक प्रश्नांचा भडीमार करत जनतेला या प्रश्नाची उत्तरे द्या, असे आव्हान दिले. चाकण एमआयडीसी परिसरात असलेल्या एका नामांकित कंपनीच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन पुकारले होते मात्र त्या आंदोलनाचे पुढे काय झाले असा सवाल बाबाजी काळे यांनी उपस्थित केला आहे. काळे म्हणाले, तुम्ही ज्या कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते ते आंदोलन स्थगित करून तुमची स्वतःची कंपनी कशी उभी राहिली याचा या प्रश्नाचे उत्तर द्या. त्याचबरोबर खेड तालुक्यात एका खूनाची चर्चा सुरू आहे. त्या खुनाच्या संदर्भातील अनेक आरोप विरोधकांवर झाले होते. याबाबत अनेक चर्चा देखील झाल्या. त्याबाबत एका ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत बाबाजी काळे यांनी त्या खुनामध्ये तुमचा नेमका काय संबंध काय आहे असा सवाल उपस्थित केला आहे. शरद पवार यांच्या सभेतील एका वाक्याचा संदर्भ देत मोहितेंवर काळे यांनी प्रश्नांची तोफ डागली आहे. यामध्ये काळे म्हणाले या चाकण एमआयडीसीमध्ये असलेल्या उद्योजकांना दहशतीखाली ठेवून भंगार आणि इतर व्यवसाय मिळवण्यासाठी विरोधकांनी जे काही प्रयत्न केले ते सर्वांना माहीत आहेत. त्याबाबत देखील स्थानिक भूमिपुत्रांना या औद्योगिकीकरणाचा फायदा झालेला नाही याउलट त्याचा फायदा लाटला असा आरोप बाबाजी काळे यांनी विरोधकांवर केला आहे. राजगुरूगरातील रॅलीला प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांची आज राजगुरुनगर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्यासंख्ये महाविकास आघाडीचे स्थानिक नेते कार्यकर्ते शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.