अमोल कोल्हे यांची ग्वाही : ढोक सांगवीच्या गावकऱ्यांनी मांडल्या व्यथा
रांजणगाव गणपती – रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर ली. कंपनीच्या प्रदुषणासंदर्भात लवकरच संसदेत आवाज उठवणार असल्याची ग्वाही खासदार डाँ. अमोल कोल्हें यांनी दिली.
अमोल कोल्हें हे शिरूर तालुक्यात दौ-यावर आले असता निमगाव भोगी व ढोकसांगवी येथील ग्रामस्थ व पदाधिका-यांनी त्यांची भेट घेऊन रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या प्रदुषणाचा पाढा वाचला. ग्रामस्थांना आश्वासन देताना खासदार बोलत होते.
निमगाव भोगी गावात महाराष्ट्र एनव्हायरो कंपनीकडून दूषित पाणी सोडल्यामुळे पाण्याचे सर्व स्त्रोत दूषित झाले असून पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
पाणी उपलब्धत करुन द्यावें, यासाठी सरपंच उज्वला अंकुश इतके यांनी रांजणगाव औद्योगिक विभागाकडे पत्रव्वहार केल्याचे माजी सरपंच सचिन सांबारे यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे व वापरण्याच्या पिण्याचे स्ञोत खराब झाले आहेत. त्यामुळे पाणी देण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाने शब्द दिला होता. परंतु पाणी दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याचा पाण्याची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
गावात लोकांच्या आरोग्याचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जमीनी नापीक झालेल्या आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झालेले आहेत. त्या पाण्यामुळे लोकांना अनेक साथीचे रोग उद्भवले आहे. लोकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहेत. लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अशीच जर परिस्थिती राहिली तर गावात जनावरांसोबत माणसांचे जीवनमान धोक्यात येईल. भयावह परिस्थिती निर्माण होईल तरी कंपनीने घेतलेले वाढीव क्षेत्र रद्द करण्यात यावे, अशी माहिती कोल्हे यांना देण्यात आली. याबाबतचे निवेदन सरपंच उज्वला अंकुश इचके यांनी दिले आहे.
शिरूर-आंबेगाव कॉग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे यांनी सांगितले की, रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील पेप्सिको, महाराष्ट्र एनव्हायरो पावर ली. टाटा बँटरी, सिद्धार्थ स्टार्च प्रा. कंपन्यांमुळे ढोकसांगवी व निमगाव भोगी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे स्त्रोतच खराब झाले आहेत. परिणामी अनेक नागरिकांना व ग्रामस्थांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार करुनही वेळीच कोणतीही दखल घेतली न गेल्याने पाण्याचे स्ञोतच खराब व दूषित झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. यशवंत पाचंगे व सचिन सांबारे यांचा हा तक्रारींचा पाढा ऐकून खासदार कोल्हे यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या प्रदुषणावर सखोल माहिती घेऊन लवकरच संसदेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले.