पुणे जिल्हा : बेलवाडीत गोल रिंगणाने आसमंत निनादला

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अंथुर्णे मुक्कामी
नीलकंठ मोहिते
इंदापूर – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण सालाबाद प्रमाणे, यंदा बेलवाडी (ता. इंदापूर) येथे रंगले. तुकोबा – विठ्ठलाच्या जयघोषाने, टाळमृदंगाच्या निनादात, अश्वांच्या दौडीने आसमंत दुमदुमून निघाला.
वैष्णवांच्या उत्साहाला आलेले उधाण, परिसरात चैतन्यमय असलेले वातावरण, अश्वांच्या बरोबरीने धावणारे वैष्णवजन, अशा उत्साही भक्तीमय वातावरणात, गोल रिंगण सोहळ्यास संत तुकाराम महाराज पालखी समोरील चालणारा नगारा, सर्वात प्रथम रिंगण स्थळावर सकाळी साडेसात वाजता पोहोचला. येथील गावकऱ्यांनी व बालचिमुरड्यांनी संत तुकोबारायांची काढलेली रांगोळी, गावातील भजनी मंडळाचा हरिनाम घोष, झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी भगिनी यांनी गोल रिंगण स्थळावर एन्ट्री करून, रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
पालखीतील अश्व रंगस्थळावर येताच, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम हा जयघोष उपस्थितांनी केला. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम भजनाने प्रति पंढरीचे स्वरूप बेलवाडीला प्राप्त झाले होते. प्रथेप्रमाणे धनगर बांधवांनी मेंढ्यांचे रिंगण पूर्ण केले व पालखी रथाला मेंढ्यांनी प्रदक्षिणा केली. राज्याचे माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे व शरयु फाउंडेशनच्या प्रमुख शर्मिला पवार यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. तसेच मानाच्या अश्वांचे पूजन करून अश्व रिंगणात दाखल केले.
रिंगण सोहळ्यात वारकरी टाळकरी पखवाजे तुळशी वाल्या भगिनी झेंडेकरी यांचे रिंगण झाल्यानंतर मानाचे अश्व धावण्यासाठी रिंगणात सोडण्यात आले. वेगाने अश्वांनी आपली प्रदक्षिणा पूर्ण केली. अश्वांचे दर्शन व त्यांच्या पायाखालची धूळ मस्तकी लावण्यासाठी हजारो हात जमिनीवर टेकले. उत्साहपूर्ण रिंगण सोहळा आटोपल्यानंतर, बेलवाडी गावामध्ये पालखी पहिल्या विसाव्यासाठी दाखल झाले.
गावकऱ्यांनी प्रत्येक प्रमाणे वारकऱ्यांना भोजन देत, वारकऱ्यांचे आधारतिथ्य केले. बेलवाडी गावकरी गोल रिंगण सोहळा म्हणजेच आपला मोठा सण मानत असून, अनेक पै पाहुणे परगावी दिलेल्या मुली, नातवंडे तुकोबारायांच्या दर्शनासाठी अलोट गर्दीत दिसत होते. फुगड्या रंगल्या, लगोरी वारकऱ्यांनी रचल्या, झिम्माचे वारकऱ्यांनी फेर धरले, ते नयनरम्य दृश्य उपस्थितांनी डोळ्यात टिपले.
यावेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह भ प भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, बेलवाडी गावच्या सरपंच मयुरी जामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर उपस्थित होते.
गुन्हेगारांमागे धावणारे पोलीस वारीत धावले
हे पंढरीच्या पांडुरंगा लवकर तुझे दर्शन घडू दे, या श्रद्धेने निघालेला क्षेत्र देहू येथून संत तुकोबारायांच्या पालखीतील वारकऱ्यांचा रिंगण सोहळ्यात देहभान विसरून, माझा हा वारीचा नियम अखंड राहू दे अशीच विनवणी पंढरीच्या पांडुरंगाला हरिनामातून करताना दिसत होते. 24 तास जनतेला संरक्षण पुरवणारी पोलीस यंत्रणा, हरिनामात दंग होऊन रिंगण सोहळ्यात देहभान विसरून प्रदक्षिणा पूर्ण केली. एरवी गुन्हेगारांच्या मागे धावावे लागते; मात्र हरिनामाच्या रंगात वेगळा आनंद मिळाला अशी भावना अनेक पोलीस बांधवांनी यावेळी व्यक्त केली.





