Pune District : शिरूर शिक्षक पतसंस्थेची आर्थिक प्रगती आदर्शवत – आमदार कटके

टाकळी हाजी – जिल्ह्याने आदर्श घ्यावा अशी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था असून या पतसंस्थेची उलाढाल व आर्थिक प्रगती वाखाणण्याजोगी आहे, असे शिरूर – हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी प्रतिपादन केले. शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ९५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस चेअरमन रामचंद्र नवले यांनी आपल्या प्रस्ताविकात संस्थेचा लेखाजोखा मांडला. जिल्ह्यात अग्रमानांकित शिरूर पतसंस्थेचे १५९३ सभासद असून ४०३ कोटी संस्थेची वार्षिक उलाढाल आहे. ९९ कोटी रुपयांच्या सभासद ठेवी असून संस्थेचे वसूल भागभांडवल ५८ आहे. सभासदांना १८३ कोटी रुपये कर्जवाटप केले आहे. यावर्षी संस्थेला ४ कोटी १ लाख नफा झाला असून सभासदांना प्रोरेटा पद्धतीने ११ टक्के इतका उच्चांकी लाभांश प्रस्तावित केलेला आहे.
माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी आपले मनोगत करताना संस्थेचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे यांनी भूषवले. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते एमपीएससी परीक्षा निवड झालेले शिक्षक, पाल्य, राज्य, जिल्हा ,तालुका पुरस्काराने सन्मानित शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक, पाचवी व आठवी स्कॉलरशिप मधील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक दहावी बारावी यातील गुणवंत विद्यार्थी या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आदर्श संचालक म्हणून माजी सभापती शर्मिला नीचित यांना सन्मानित करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल महाराष्ट्र राज्य वेतन निश्चिती सल्लागार मंडळ अध्यक्ष गणेश ताठे राज्याध्यक्ष अनिल पलांडे कारेगावच्या सरपंच वृषाली गवारे, उपसरपंच शहाजी तळेकर पत्रकार संभाजी गोरडे, प्रवीण गायकवाड यांसह परिसरातील अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन पोपट इंगवले अर्जुन निचित, कल्याण कोकाटे यांनी केले. दुसऱ्या सत्रात संस्थेच्या आर्थिक वर्षातील कारभाराविषयी चर्चा करण्यात आली. सभासदांच्या प्रश्नांना सचिव विजय गोडसे, उपसभापती संदीप थोरात, माजी सभापती संतोष विधाटे, खजिनदार अंजली शिंदे यांनी उत्तरे दिली.
तालुक्यातून बदलून बाह्य तालुक्यात गेलेल्या सभासदांचे सभासदत्व कायम राहण्यासाठी पोटनियम दुरुस्ती एकमताने मंजूर करण्यात आली, असल्याचे सचिव विजय गोडसे यांनी सांगितले.
राज्याध्यक्ष अनिल पलांडे, उत्तम भंडारे, संतोष गावडे, सखाराम फंड, संजय तळोले, नाथा वीर, माउली पुंडे, शहाजी पवार, अध्यक्ष अशोक कर्डीले, प्रकाश नरवडे, भाऊसाहेब दुर्गे, अखिल अध्यक्ष अशोक पठारे, डिसिपीएस अध्यक्ष हनुमंत वाळुंज, पोपट गांधले, युवराज थोरात, संतोष शेवाळे, सोमनाथ गायकवाड, यांच्यासह संचालक चंद्रकांत खैरे, म्हातारबा बारहाते, अनिल शेळके, मानसी थोरात, अविनाश चव्हाण, संतोष थोपटे, विश्वास साकोरे, कैलास गारगोटे, प्रभाकर शेळके, शरद झेंडे आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी शोभा तीकांडे, साधना खोमणे, नयना अरगडे, या महिला आघाडी अध्यक्षांसह माजी सभापती वंदना पाचर्णे, सुप्रिया नवले आदी महिला सभासद उपस्थित होत्या.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत दुसऱ्या सत्रात मांडलेल्या अहवालावर प्रश्नोत्तरांचा भडीमार झाल्याने संचालक मंडळाला अनेकदा गप्प बसावे लागले, असे विरोधी संचालक मंडळ यांजकडून सांगण्यात आले.
अहवालावरील आक्षेप घेत थकबाकीदारांचा मुद्दा व संस्थेतील थकबाकी व एनपीएचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे सभासदांनी निदर्शनास आणले. नेट एनपीए १५-१६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याबद्दल संचालक मंडळावर टीका करण्यात आली.
खोट्या एनओसी देणे, कोटेशनशिवाय टेंडर पास करणे, बाहेरील सभासद, लेखापरीक्षण करणारे ऑडिटर दरवर्षी बदलले पाहिजेत, आदी मुद्दे नंद किशोर पडवळ त्यांनी उपस्थित केले. सभेत माऊली पुंडे, उत्तम भंडारे, संतोष शेवाळे, शरद धोत्रे, लहू शितोळे, ज्ञानदेव कुरुंदळे, सुनील शेळके आदी सभासदांनी प्रश्नांचा भडीमार केला. या प्रश्नांना सुरुवातीला संचालक मंडळाकडे ठोस उत्तर नव्हते. मात्र अखेरीस त्यांनी सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला, असे विरोधकांचे वतीने सांगण्यात आले.





