संदीप बोडके
थेऊर -हवेलीतील 54 ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीचा बिगुल वाजला असून स्थानिक पातळीवरील नेत्यांनी ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचे आखाडे बांधत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. स्थानिक ग्रामपंचायत ताब्यात असेल तर पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गटात व पर्यायाने तालुक्यात किंमत व मान सन्मान असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची खरी कसोटी लागणार आहे. स्थानिक पातळीवर वर्चस्व मिळवण्यासाठी गावपातळीवरील नेत्यांनी कंबर कसली असून राजकीय सारीपाटावर आपल्या कार्यकर्त्यां मार्फत गावकी व भावकीमध्ये शह काटशह चाली सुरू केल्या आहेत. त्यामधून संभाव्य पॅनेलची चाचपणी सुरू केली आहे.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरूळी कांचन, केसनंद, थेऊर, कुंजीरवाडी, मांजरी खुर्द, सोरतापवाडी, तरडे,आळंदी म्हातोबाची, अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव, कोरेगांवमुळ, नायगांव, न्हावी सांडस, पेठ, प्रयागधाम, सांगवी सांडस, शिंदेवाडी, शिंदवणे, वळती, बकोरी, भावडी, बिवरी, डोंगरगांव, शिरसवडी, तुळापूर, वढू खुर्द, बहुली, खडकवाडी, कुडजे, मांडवी बुद्रुक, मांडवी खुर्द, सांगरूण, औताडे हंडेवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी, वडकी, डोणजे, घेरासिंहगड, गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सोनापूर, आंबी, जांभळी, मणेरवाडी, वरदाडे, आर्वी, गाऊडदरा, खेडशिवापूर, कोंढणपूर, रहाटवडे, शिवापूर, श्रीरामनगर या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
लोणी काळभोर, उरूळी कांचनची लोकसंख्या जास्त असल्याने त्याठिकाणी जोरदार चुरस राहणार आहे. तालुकास्तरीय नेत्यांचे विशेष लक्ष या निवडणुकीच्या घडामोडींकडे आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस हे राजकीय पक्ष ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी कामाला लागलेले आहेत. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतीत स्थानिक गटा- तटावर निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक गटातटाच्या राजकीय आखाड्यात विखुरले गेल्याने स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची शक्यता दिसून येत आहे.