Pune District : शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिशा देणारा दीपस्तंभ

क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ः लासुर्णे येथे सेवापूर्ती समारंभ
इंदापूर – प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जडणघडणीत, त्या – त्या विषय शिक्षकांचे योगदान मोलाचे असते. खर्या अर्थाने, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात योग्य दिशा देणारा शिक्षक दीपस्तंभ असतो, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडामंत्री व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथे श्री छत्रपती हायस्कूल, सणसर येथील मुख्याध्यापक सुनील सर्जे, तसेच शिक्षक विजय थोरात, पुंडलिक सोनवणे सर यांच्या सेवापूर्ती गौरव कृतज्ञता सोहळा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सेवापूर्ती सन्मान क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिक्षकांचा केला. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, यांच्यासह छत्रपती कारखान्याचे संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागातील चांगले तीन शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. या तीन आदरणीय शिक्षकांनी अनेक वर्षे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांना विद्यार्थी संस्था तसेच तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कदापी विसरणार नाही. जरी ते सेवानिवृत्त होत असले तरी देखील त्यांच्यावरील असणारे प्रेम, जिव्हाळा अखंड विद्यार्थी ठेवतील, असाही विश्वास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.





