Pune District : पुरंदरमध्ये सोमवारपासून गावोगांवी धावणार टँकर

दिवे : पुरंदर तालुक्यात टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात घट झाली असून नागरिकांना पाण्यासाठी ऐन यात्रांच्या काळात वणवण फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे काही दिवसापर्यंत केवळ दोन टँकर सुरू असताना आता त्यामध्ये देखील वाढ झाली असून अनेक गावांनी टँकरचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढली आहे त्यामुळे सोमवारपासून गावोगांवी पाण्याचे टँकर दिसण्यास सुरुवात होणार आहे.
पुरंदर तालुक्यातील पिसे, नायगाव आणि पूरपोखर या तीन गावांत दोन टँकर च्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु होता. मात्र या पंधरवड्यात पाणी पुरवठा करणार्या धरणातील पाणीपाठा प्रचंड प्रमाणात कमी झाला. अनेक गावांच्या नळ पाणी पुरवठा करणार्या योजना अडचणीत आल्या आहेत. नळ पाणी योजना बंद होत असल्याने आणि परिसरातील पाणवठे रिकामे झाल्याने या गावांना आता टँकरॅच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, पुरंदर तालुक्यात चैत्र महिन्यात विविध गावांच्या ग्रामदेवतेच्या वार्षिक यात्रांचा हंगाम सुरू असून यानिमित्त गावोगावी विविध धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक आणि करमणुकीचे कार्यक्रम पार पडत असतात. वर्षातून एकदा येणार्या उत्सवानिमित्त घरोघरी जेवणाच्या पंक्ती बसत असतात. नाते वाईक, पाहुणे, मित्रमंडळी यानिमित्त येतात. मात्र याच कालावधीत पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिल्याने यात्रांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अनेक वेळा केवळ पाण्याअभावी कित्येक गावांनी वार्षिक यात्रा रद्द केल्याचा अनुभव आहे. सध्या यात्रांचा कालावधी सुरू असून एकेका दिवशी दोन, तीन गावांच्या यात्रा असतात. साधारण महिना अखेरपर्यंत यात्रांचा कालावधी असून त्यासोबतच लग्न हंगाम सुरू असल्याने प्रशासनाकडून पाण्याबाबत खबरदारी घेण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
या गावांचे टँकर मंजूर
या आठवड्यात टँकरची मागणी सोनोरी, झेंडेवाडी, राजुरी, वाल्हे, सिंगापूर, पोंढे, साकुर्डे, वागदरवाडी आदी गावांना टँकर मंजूर झाले असून साधारणपणे सोमवार पासून टँकर सुरु होण्याची शक्यता पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागकडून व्यक्त करण्यात अली आहे. त्याचप्रमाणे एखतपूर, रीसे, खानवडी, वाळूंज या गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले असून त्यानाही लवकरच मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.
धरण***एकूण पाणीसाठा***उपयुक्त पाणीसाठा** टक्केवारी
गराडे***1. 85***1. 56***00
घोरवडी***1. 91***1. 86***23
पिंगोरी***0. 57 ***0. 56***24
विरनाला***2. 55***2. 00***13
माहूर***2. 38***1. 83 ***17
पिलाणवाडी***1. 96***1. 83*** 11
पिसर्वे ***1. 74***1. 65***00
आडवाडी***0. 066***0. 066 ***00
वाल्हा***0. 071*** 0. 072***00





