शेलपिंपळगाव : तळेगाव -चाकण-शिक्रापूर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहतीतील कंपन्यातील मालाची वाहतूक होत असते. मोठे ट्रक, कंटेनर, ट्रेलर यामधून मालाची धोकादायक वाहतूक होते. या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात सातत्याने अपघात होत आहेत. अगदी दिवसाला सरासरी चार ते पाच अपघात होत असले तरी संबंधित प्रशासकीय विभाग गांभीर्याने लक्ष देत नाही, यामुळे नागरिक, कामगार यांच्याकडून वेळोवेळी संताप व्यक्त होतो मात्र तरीही या मुर्दाड प्रशासनाला जाग येत नाही.
अवजड वाहनांच्या वाढत्या रहदारीमुळे काहींचा मृत्यू होतो तर काहीजण अपंग होतात. दर महिन्याला सरासरी या रस्त्यावरील अपघातात दहा जणांना आपले प्राण गमवावे लागते तर कित्येकांना कायमस्वरूपीचे अपंगत्व प्राप्त होते. रहदारीमुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहेच; मात्र अतिक्रमणामुळे हप्तेगिरी मोठ्या प्रमाणात चालते त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहेत. अवजड या रस्त्यावर नेहमी भरधाव वेगात चालवली जात असल्याने अपघात होतात.
यामुळे कित्तेक दुचाकीस्वार, पादचारी तसेच कामगार यांचा मृत्यू झालाय. या वाहनांच्या वेगावर बंधन तर नाहीच मात्र ही अवजड वाहने असल्याने इतर वाहनांना तसेच पादचार्यांना या अवजड वाहनांचा धक्का बसतो. त्यामुळे सातत्याने अपघात होतात. ही वाहने वळताना तसेच अचानक बंद पडल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.
पोलिसांकडून तात्पुरतीच केली जाते कारवाई
वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, कर्मचारी या अवजड वाहनांना दंड करतात. बेशिस्त वाहनांवर कारवाई ही केली जाते; परंतु ही कारवाई तात्पुरती असते. या रस्त्यावरील अवजड वाहने बर्याचदा मद्याच्या नशेत असलेले चालक चालवतात. दहा दिवसांपूर्वीच याच रस्त्यावरील पिंपळे जगताप गावच्या हद्दीत मध्याच्या निषेध असलेल्या चालकाने बाप व दोन लेकांना गाडीखाली चिरडले होते, माणिक चौकात काही दिवसांपूर्वी एक पादचारी महिला एका कंटेनरच्या खाली गेली. सुदैवाने ती वाचली, या महामार्गावरील अनेक गावच्या हद्दीतील शाळा या रस्त्यालगतच आहे. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होतात. कित्येकांचे जीव जातात तर कित्येकांना दुखापतही होते. तरीही प्रशासनाला या रस्त्याविषयी जाग येत नसल्याने मोठी नाराजीच व्यक्त केली जात आहे.