Pune District : जागा भाड्याने व विकत देणाऱ्यांवर कारवाई करा

रांजणगाव गणपती : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मागील काही महिन्यांपूर्वी बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आढळले होते. ज्या ठिकाणी हे नागरिक काम करतात. असे काम देणाऱ्या नागरिकांवर, त्यांना जागा विकत व भाड्याने देणाऱ्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्याकडे केली आहे.
रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याबरोबर देशातील विविध प्रांतातील नागरिक या ठिकाणी राहत आहेत. त्याचबरोबर विदेशी नागरिक, रोहिग्या हे देखील पंचक्रोशीत बेकायदेशीर रहात आणि काम करीत आहेत. संबंधित नागरिकांकडून काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन काम करतच आहे, काही दिवसापूर्वी कारेगाव परिसरात पोलिसांनी बांगलादेशी नागरिक पकडले होते.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये आणि परिसरात रोहिग्या हे हॉटेलमध्ये, कटिंग दुकानात, बांधकाम साईटवर, लेबर कॉन्ट्रॅक्ट इतर व्यवसायत कमी पगारात अनाधिकृतपणे याठिकाणी काम करीत असल्याचे समजते आहे.
ज्या रूम, फ्लॅटमध्ये हे लोक आढळतील त्या संबंधित मालकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच जागा मालकाने ही गुंठेवारी करून बांगलादेशी नागरिकांना जागा दिल्यास त्याच्यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.





