पुणे जिल्हा : शेतकरी कुटुंबातील स्वप्निल चमकला

स्पर्धा परीक्षेत राज्यात ६८ वा : शिंदोडीतील गावकऱ्यांना सार्थ अभिमान
निमोणे – शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले. जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून स्वप्निल वाळुंज याने या परीक्षेत राज्यात ६८ वा क्रमांक मिळवत कुटुंबीय व गावचे नाव उज्ज्वल केले आहे.
शिंदोडी गावातील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल याचे १ ते ७ वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण शिंदोडी येथील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण गुनाट येथील दत्त माध्यमिक विद्यालयात, उच्च माध्यमिक शिक्षण शिरुर येथील विद्याधाम प्रशाला आणि अभियांत्रिकी शिक्षण पुणे येथील सिंहगड महाविद्यालयात झाले. स्वप्निल याला लहानपणापासून वाचनाची व क्रिकेटची आवड असल्याने त्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत याचा फायदा झाला.
शेतकरी कुटुंबातील स्वप्निल अधिकारी
शिरुर तालुक्यातील शिंदोडी गाव हे घोड धरणाच्या कडेला असणारे बागायती गाव. स्वप्निलचा जन्म वाळुंज या शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे चुलत आजोबा रंगनाथ वाळुंज हे १९८५ साली शिंदोडी गावचे सरपंच होते. तर स्वप्निलचे सख्खे आजोबा पोपटराव वामन वाळुंज यांना भजनाची प्रचंड आवड होती. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर अनेकवेळा त्यांच्या संगीत भजनाचे कार्यक्रम झाले आहेत. स्वप्निलचे दुसरे चुलत आजोबा ज्ञानदेव वाळुंज हे गावातील नामांकित हाडवैद्य होते.
स्वप्निलने केले आजोबांचे स्वप्न पूर्ण
आपला नातू स्वप्निल याने लाल दिव्याच्या गाडीत बसून यावे हे स्वप्निलचे आजोबा पोपटराव वाळुंज यांचे स्वप्न होते. परंतु डिसेंबर २०२२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर एक वर्षाने डिसेंबर २०२३ मध्ये स्वप्निलने एकाचवेळी तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्याने सहायक आयुक्त (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक अशा तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. पण हे यश पहायला मात्र आजोबा नव्हते, याचे शल्य आजही वाळुंज कुटुंबीयांना आहे.
राज्यात प्रथमच शिंदोडी गावाचा डंका
स्वप्निल वाळुंजच्या रुपाने शिंदोडी गावचे नाव प्रथमच महाराष्ट्र राज्यात झळकले. शेतकरी कुटुंबातील स्वप्निल याची आई गृहिणी तर वडील शेतकरी आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या स्वप्निलने सन २०१९ पासुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी चालु केली होती. परंतु करोना महामारीमुळे २०२० आणि २०२१ या दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे २०२२ मध्ये झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत स्वप्निलने सहायक आयुक्त, (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक या तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
माझ्या यशात कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षकांचा वाटा
माझ्या या सर्व यशात माझे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, मित्र परिवार, शिंदोडी गावचे ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा असल्याचे स्वप्निल वाळुंज याने ‘दैनिक प्रभात’ शी बोलताना सांगितले. ज्या वेळेस माझ्या आयुष्यात निराशेचे क्षण आले. त्यावेळेस माझ्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती माझ्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे हे यश मी मिळवू शकलो.





