– पाऊस उघडल्याने शेतकरी शेतीच्या कामात मग्न लाखणगाव – आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये ऊस लागवडीच्या कामांना वेग आला आहे.एक जून पासून ऊस लागवडीचा कार्यक्रम सुरू होतो.परंतु यावर्षी मे महिन्यापासूनच सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना शेती कामे करण्यासाठी पावसामुळे वापसा मिळाली नाही. सध्या पाऊस थोडासा उघडल्याने शेतकरी ऊस लागवड करण्यात मग्न झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील बारमाही पाणी उपलब्ध आहे. घोडनदीवर बांधण्यात आलेले हुतात्मा बाबू गेनु सागर डींभे धरण यामुळे घोडनदीला बारमाही पाणी राहते.तसेच उजवा व डावा कालव्यालाही पाणी येते.त्यामुळे तालुक्यातील विविध गावे ही सुजलाम सुफलाम झाली असून बारमाही बागायती झाली आहेत. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे असल्याने ऊस लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. सर्वात जास्त ऊसाची शेती केली जाते. एक जून पासून ऊस लागवडीचा कार्यक्रम सुरू होतो. त्यामुळे शेतकरी ऊस लागवड एक जूनपासून सुरू करतात. परंतु यावर्षी मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने ही ऊस लागवड कुठेतरी थांबली होती. आता पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने शेतकरी ऊस लागवडीची कामे करत असून शेती मशागत करून ताबडतोब लागवड करून घेत आहे. कारण परत पाऊस झाला तर उसाची लागवडीला उशीर होईल. त्यामुळे शेतकरी सध्या ऊस लागवड करताना पाहावयास मिळत आहे. २६५ जातीच्या वाणाच्या उसाची लागवड जास्त प्रमाणावर होत आहे. सध्या ऊसालाच चांगला भाव तरकारी पिकांचे कायम वर खाली होणारे बाजार भाव,दुधाचा पडलेला भाव यामुळे हक्काचे उत्पन्न देणारे पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिले जाते. सध्या ३००० ते ३२०० रुपये प्रति टन असा बाजारभाव मिळत आहे.अनेक शेतकरी हमखास पैसे देणारे पीक म्हणून या पिकाची लागवड करतो. पावसाने उसंत घेतल्याने उस लागवड करण्याचा कामांना वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.