Pune District : मधुमेहेसाठी शुगर फ्री निळा बटाटा

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील बटाटा वाणाचे व्यापारी व प्रयोगशील शेतकरी शांताराम थोरात यांनी आपल्या शेतात प्रायोगिक तत्वावर लागवड केलेल्या मधुमेह (शुगर-फ्री )कुफरी निळकंठ जातीच्या (निळ्या बटाटा) वाणाची केलेली लागवड यशस्वी ठरली असून त्यांना या शुगर फ्री निळ्या बटाट्याचे चांगले उत्पन्न निघाले आहे. कूफरी निळकंठ बटाटा लागवडीचा हा या भागातील पहिलाच प्रयोग हा बटाटा मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला.
मंचर येथील प्रसिद्ध बटाटा बियाणाचे व्यापारी शांताराम थोरात व त्यांचे कुटुंब गेल्या 80 वर्षांपासून बटाटा बियाण्यांचा व्यवसाय करत असून बाजारात आलेल्या नवनवीन बटाटा जातीच्या बियाने लागवडीचा प्रयोग ते आपल्या शेतात दरवर्षी करत असतात.यावर्षी त्यांनी आपल्या शेतात वीस गुंठे क्षेत्रात कुफरी मोहन, कुफरी पुखराज, कुफरी नीलकंठ या तीन जातीच्या बटाट्याच्या लागवडीचा प्रयोग केला होता. यातील कुफरी मोहन, कुफरी पुखराज, हे रेगुलर पांढरे बटाटा असून कुफरी नीलकंठ हा निळा व आतून पांढरा रंग असलेला बाजारात नवीनच आलेला बटाटा आहे.
कृषी विभागामार्फत दरवर्षी बटाटा बियाण्याचे विविध वाण बाजारात विकसित केले जातात.आलेल्या नवनवीन बटाट्याचे व्हरायटीचे प्रयोग आम्ही घरच्या शेतीत करत असतो किंवा राहुरी विद्यापीठ या ठिकाणी प्रयोग घेतले जातात. हा बटाटा उत्पादनास छान असून करपा रोगाला लवकर बळी पडत नाही. आत्ता जरी शेतकर्यांना या बटाट्या बद्दल जास्त माहीत नसली तरी भविष्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या बटाट्याची लागवड होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाईल. असे थोरात यांनी सांगितले.
उत्तर भारतात थोड्याफार प्रमाणा पिकवतात
कुफरी नीलकंठ निळा बटाटा हा भारतातील उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पिकवला जात असून दोन वर्षांपूर्वी त्याचे वाण (बियाणे) विकसित केले आहे. या बटाट्यात अँटिऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असून शरीरासाठी उपयुक्त असलेल्या विविध घटकांचे प्रमाण चांगल्या प्रकारे असल्याने हा बटाटा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात वापरला जाणार आहे.
सर्व अभ्यास करूनच घेतले उत्पादन
उत्पादन केलेला निळा बटाटा हा मधुमेह रुग्णांसाठी खूप उपयुक्त असून यावर सर्व प्रकारे अभ्यास करून तो बाजारात उपलब्ध करावा की नाही ? तो खाण्यास योग्य आहे की नाही ? महाराष्ट्रातील वातावरणात हा बटाटा टिकेल की नाही? याचा सर्व अभ्यास करून तो लागवड करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाला असून महाराष्ट्रातील ग्राहकांना याबाबत अजून फारसे माहित नसल्याचे शांताराम थोरात यांनी सांगितले.
बटाटा अचानक मार्केटमध्ये आला तर ग्राहक तो घेणार नाहीत. या बटाट्याचे फायदे काय याविषयी जाहिरात होणे गरजेचे आहे.भविष्यात हा बटाटा बाजारात त्याचे स्वतःचे अस्तित्व तयार करून मोठया प्रमाणात विकला जाईल.
– शांताराम थोरात, बटाटा उत्पादक शेतकरी, मंचर





