Pune District : बसस्थानकातील डांबरीकरण कामाचा प्रस्ताव सादर करा

– माजी मंत्री वळसे पाटील यांची सूचना
मंचर : मंचर एसटी बस स्थानकावर उभारलेले इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित करावे. तसेच मंचर बस स्थानकाचे डांबरीकरण करण्यासाठी प्रस्ताव सादर करा,अशी सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
मंचर एसटी आगारामार्फत सद्यस्थितीत मिळत असलेली एसटी सेवा समाधानकारक नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या असलेल्या मागणी समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मंचर येथील संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीस आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव मोरमारे, दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, एस टी महामंडळाचे सल्लागार समितीचे माजी सदस्य डी. के. वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष सुषमा शिंदे,
घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया,नारायणगाव एसटी आगाराचे आगार प्रमुख वसंतराव अरगडे, मंचर बस स्थानकाच्या प्रमुख साधना कालेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, मंचर एसटी आगाराचे तांबडेमळा येथे असलेल्या आगारात सिमेंट काँक्रिटीकरणासाठी कार्यवाही केली जाईल. आदिवासी योजनेच्या माध्यमातून केवळ विद्यार्थिनींना महाविद्यालयात जाण्यासाठी दहा एसटी गाड्यांचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना करण्यात आली
असून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांना जाण्या येण्यासाठी मंचर बस स्थानकावरून अर्ध्या तासाला एसटी गाडी सोडण्यात यावी. तसेच पुणे येथे जाण्यासाठी शटल सेवा सुरू करण्याची कार्यवाही करावी.अशी सूचना करण्यात आली.यावेळी विभाग नियंत्रण अरुण सिया म्हणाले, चांगल्या पद्धतीने एसटी सेवा देण्यासाठी कार्यवाही केली जाईल.असे आश्वासन दिले.
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची सूचना
मंचर बस स्थानकावर असलेले महामंडळाचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून त्याचा वीजपुरवठा सुरू होण्यासाठी काही ठिकाणी अडथळे येत आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशन सुरू होत नाही. त्यासाठी लवकरात लवकर चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीत केली.





