Pune District: रांजणगावातील उपकेंद्र रामभरोसे

रांजणगाव गणपती : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये महावितरण कंपनीचे उपकेंद्र कार्यरत आहे.
हे उपकेंद्र सध्या रामभरोसे सुरू आहे. याला कोणी वालीच नाही, अशी विदारक स्थिती दिसून येत आहे. या केंद्रात ऑपरेटर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा भार टपरीवाल्यावर आला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रांजणगाव केंद्रामधूनच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांमधील वीज पुरवठा संचलित व सुरळीत करण्याचे काम केले जाते. या ठिकाणी तीन ते चार मनुष्यबळ काम करत असते. रांजणगाव महावितरण केंद्रातंर्गत हे कार्यालय काम करते. मात्र, गेले काही दिवसापासून महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये कामचुकार कर्मचाऱ्यांचा भरणा झाला आहे. अनेक कामांमध्ये कामचुकारपणा होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यातच बुधवार (दि.26) फेब्रुवारी रोजी तर विशाल शिंदे नावाच्या ऑपरेटर पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कार्यालयाला केवळ कडी लावून कारेगाव गाठले होते, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
कार्यालयाच्या बाहेर असलेल्या एका टपरीवाल्याने या ठिकाणी वॉचमन असल्याचे सांगत वेगळेच वळण दिले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी विशाल शिंदे या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





