राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती पाबळ – शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळावेगळ्या पद्धतीने करण्यात आला. याप्रसंगी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या उपसंचालक कमलादेवी आवटे यांनी विद्यालयातील स्टेम लॅब कौशल्य विकास प्रयोगशाळेत भेट दिली. आपत्कालीन बचाव कार्य करण्यासाठी उपयुक्त ‘रेस्क्यू शूज’ या उपकरणाबाबत विद्यार्थांकडून माहिती घेतली. यावेळी विजेचे सुवाहक व दुर्वाहक या कृतिबाबत विद्यार्थांशी संवाद साधला. प्रयोगशाळेतील विविध प्रकल्प रोबोटिक्स, कोडींग, कृतीयुक्त शिक्षण, थ्रीडी प्रिंटरचे कार्य आदी प्रकल्पांशी संबंधित आवश्यक सेंसरची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे वरिष्ठ अधिष्ठाता डॉ दत्तात्रय थिटे म्हणाले, शालेय परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचे शंभर टक्के प्रवेश व्हावेत. मुले शाळाबाह्य राहू नयेत. प्रयोगशाळेतील प्रयोगांची शिक्षकांनी स्वतः पडताळणी करावी, विद्यार्थ्यांना संशोधन करून नावीन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्यासाठी प्रेरणा द्यावी. प्राचार्य रामदास थिटे यांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प , पाठ्यपुस्तके, मिठाई स्वरूपात लाडू देऊन स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या उपक्रमास संस्था अध्यक्ष कांतीलाल उमाप, सचिव प्रकाश पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.