पुणे जिल्हा : बेलवाडीत मराठा समाजाचा रास्ता रोको

भवानीनगर – बारामती-इंदापूर रस्त्यावर पालखी महामार्गावर बेलवाडी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शनिवारी( दि 24) सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन पावणे बारा वाजेपर्यंत चालले या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी झाली होती. बेलवाडी येथील सकल मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे, मनोज जरांगे पाटील आगे बढो अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे.
आता मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे, असे विचार या आंदोलनात दरम्यान ग्रामस्थांनी व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यापुढे देखील जरांगे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे बेलवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी आंदोलनकर्त्यांची निवेदन स्वीकारले.





