काटेवाडी (गोकुळ टांकसाळे) : जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ काटेवाडी (ता. बारामती) येथील मराठा समाजाच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आला. त्यासोबत या लाठीमाराच्या विरोधात निषेध सभा देखील घेण्यात आली.
यावेळी काटेवाडी परिसरातील मराठा समाजाचे कार्यकर्त्यांबरोबर सर्व तरुण एकत्र बरोबर होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय कोंडीबा काटे, रमेश काटे, छत्रपती कारखान्याचे संचालक संजय काटे, सतीश काटे, स्वप्नील काटे, अमर जगताप, सुभाष वाघ, मिलिंद काटे, दत्तात्रय काटे, दत्तात्रय पानसरे, तसेच परिसरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांनी एकत्र येऊन इंदापूर बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून मराठा समाजावरील झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा इथून पुढील काळात तीव्र करणार असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत हा लढा काटेवाडीकर लढणार असून इतरांच्या तुलनेत काटेवाडीकर कुठेही मागे सरणार नाही, असेही यावेळी आवाहन करण्यात आले. तसेच आजपर्यंत लोकशाही मार्गाच्या माध्यमातून मराठा समाजाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने केली आहेत. परंतु संपूर्ण देशामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व तरुणांनी कुठेही उग्र आंदोलने केली नाहीत.
उलट शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलने केली. परंतु मराठा समाजावर आरक्षणासाठी आलेल्यांच्यावर लाठी हल्ला केल्याने अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते महिला जखमी झाले आहेत. त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोको करून निषेध करण्यात आला. पोलीस बांधव हे आमचे बंधू आहेत त्यांच्याबद्दल आमचे कोणते दूमत नसून राज्य सरकारवर आमचा रोष आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी जो आदेश दिले त्या आदेशाचे पालन पोलिसांनी केले आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्या आंदोलकांवर लाठी हल्ला होऊन त्यात जे नागरिक जखमी झाले. त्या घटनेचा निषेध आम्ही सर्वजण मराठा समाजाच्या वतीने करीत आहोत. यावेळी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन, देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे, पोलीस, पोलीस पाटील सचिन मोरे उपस्थित होते.
आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावरती जो लाठीहल्ला करण्यात आला त्याच्या निषेधार्थ काटेवाडी(ता. बारामती ) या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करून निषेध सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हे काटेवाडी गाव असल्याने बारामती ग्रामीण पोलिसांनी या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.