पुणे जिल्हा : पावसाची उसंत; बाजरीचा हंगाम मार्गी

काढणी, खुडणी, मळणीच्या कामास सुरुवात
आता शेतकऱ्यांचे लक्ष ब्बी हंगामाकडे
वाल्हे – पावसाने मागील तीन दिवसांपासून, पुर्णपणे उघडीप दिल्याने पिसुर्टी (ता. पुरंदर) व परिसरातील जिरायती भागातील बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. किमान बाजरीची काढणी, खुडणी व मळणी होईपर्यंत पावसाने उसंत घेतल्यास खरीप हंगामातील बाजरीचा हंगाम मार्गी लागेल, असा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.
वाल्हे व परिसरात यावर्षी, मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. यामुळे येथील शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी मागील वर्षांपेक्षा कमी प्रमाणावर बाजरीची पेरणी केली होती. यावर्षी, मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस पडला नसल्याने, अनेकांची बाजरी पिके पाण्याअभावी करपून गेली होती. ज्या शेतकरीवर्गाला पाण्याची उपलब्धता झाली, त्यांनी बाजरी पीक कसोशीने प्रयत्न करून अतिअल्प पाण्यावर, बाजरीचे पीकही चांगले आले आहे.
एकमेकांकडे ‘वारंगुळे’
सध्या पीक काढणीला आले आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून या परिसरात, काही प्रमाणात पाऊस पडत होता. मागील तीन दिवसांपासून पावसानेही उघडीप घेतल्यामुळे वातावरणही कोरडे झाले आहे. यामुळे आता बाजरी काढणीला पोषक वातावरण झाल्याने शेतकरीवर्ग सध्या जिरायती भागातील बाजरीच्या काढणीत गुंतला आहे; मात्र मजुरांच्या वाढत्या रोजंदारीवर मार्ग काढण्यासाठी सध्या शेतकऱ्यांनी एकमेकांकडे “वारंगुळे’ करीत आहेत.
…तर बळीराजा कर्जबाजारी होतील
जवळ जेजुरी औद्योगिक वसाहत असल्याने, वाल्हे, पिसुर्टी, दौंडज, जेऊर, हरणी, मांडकी परिसरातील अनेक जण या औद्योगिक वसाहतीत कामाला जातात. दिवसभर ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलून, समाधानकारक रोजंदारी मिळत नाही. यामुळे परिसरातील अनेक जण जवळील औद्योगिक वसाहतीत सकाळीच डबा घेऊन जातात.
दिवसभर रानात राबून समाधानकारक रोजगार मिळत नाही. मात्र, औद्योगिक वसाहतीत आठ तास काम केल्यावर 400 ते 500 रुपये रोजंदारी सहज मिळत असल्याने रानात कष्ट करण्यासाठी मजूर टंचाई निर्माण होत आहे. औद्योगिक वसाहतीतील रोजगार शेतात काम करण्यासाठी कामगार मागत असून, ऐवढा रोजगार शेतकऱ्यांनी मजूर वर्गाला दिल्यास शेती व्यवसाय तोट्यात जाईल. भविष्यात अशीच परिस्थितीत राहीली तर शेतकरीवर्ग कर्जबाजारी होतील. अशी चिंता शेतकरीवर्गाकडून व्यक्त होत आहे.





