Pune District : भरधाव पिकअपने सहाजणांना उडवले

दोघांचा मृत्यू, चौघेजण गंभीर जखमी : उरुळी कांचन येथे दुर्घटना
उरुळी कांचन – पुणे- सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (दि. 2) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात हा अपघात झाला.
या अपघातात अशोक भीमराव (वय 25, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक), मेहबूब रहमान मियाडे (वय 67, रा. माकरवस्ती सहजपूर, ता. दौंड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर लक्ष्मण बापूराव भारती (वय 61, रा. आश्रमरोड, उरुळी कांचन, ता. हवेली), वैशाली भागवत बनसोडे (वय 40), भागवत पेरू बनसोडे (वय 40, दोन्ही रा. सोरतापवाडी, ता. हवेली), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय 67, रा. आंबा पिंपळगाव लातूर) अशी जखमींची नावे आहेत.
टेम्पोचालक शशिकांत रोहिदास पवार (वय 24, रा. अकलूज, ता. माळशिरस) असे चालकाचे नाव असून त्याला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जमीर महबूब मीयाडे (वय 33, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे-सोलापूर महामार्गाच्या हद्दीतील उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकातील बस थांब्यावर बुधवारी (दि. 2) रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या बाजूने जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसची वाट पाहत उभे होते.
यावेळी चौकात उभे राहिलेल्या सहा जणांना पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तर उर्वरित पाच जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना लाईफ केयर रुग्णवाहिकेतून सिद्धिविनायक हॉस्पिटल हा ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे; मात्र या उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात पिकअप चालक हा सोलापूरच्या बाजूने न थांबता पळून गेला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय बंटी कांचन ओंकार रानवडे, तुषार पांगारे, प्रथमेश जगताप, आर्यन जगताप आदींनी तातडीने घटनास्थळी पोहोचले व तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.





