मंचर : सातगाव पठार (ता. आंबेगाव) येथील कोल्हारवाडी येथे प्रगतशील शेतकरी जयसिंगशेठ एरंडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये चक्रीवादळासह पाऊस घुसल्याने पोल्ट्रीतील सहा हजार पक्षी मृत्युमुखी पडल्याने अंदाजे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार, दि. १३ रोजी दुपारी घडली. कोल्हारवाडी येथे पावसासह चक्रीवादळासारखा प्रकार पाहावयास मिळाला. दुपारी एक दीडच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसामध्ये चक्रीवादळ देखील आल्याने हे चक्रीवादळ फिरत फिरत कोल्हारवाडी येथील शेतकरी जयसिंग एरंडे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसले.पावसासह चक्रीवादळ पोल्ट्रीत घुसल्याने पोल्ट्री हवा घुसली. मात्र, पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीमध्ये साचल्याने पोल्ट्रीतील सुमारे एकूण १३ हजार पक्षापैकी जवळपास सहा हजार पक्षांचा मृत्यू झाला आहे. जयसिंग एरंडे यांच्या शेतात दोन पोल्ट्री फार्म असून एका पोल्ट्रीमध्ये ७ हजार तर दुसऱ्या पोल्ट्री मध्ये ६ हजार पक्षी आहेत. हे पक्षी एक ते दोन आठवड्याचे असून पोल्टीला चारही बाजूने दोन फुटाच्या भिंती असल्याने पाणी बाहेर जाण्यास जागा उपलब्ध नाही. अचानक आलेल्या चक्रीवादळ पावसाच्या पाण्यात सर्व पक्षी भिजल्याने आतापर्यंत सहा हजार पक्षी मयत झाले असून उर्वरित सात हजार पक्षी गारठल्याने त्यामधीलही काही पक्षी मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सुरू झाले आहे. सर्व पक्षी भिजले असल्याने जवळपास ८० टक्के पक्षी मयत होण्याची शक्यता जयसिंग एरंडे यांनी वर्तवली आहे. सुमारे १३ हजार पक्षी १७ दिवसांचे झाले असून यातील ६ हजार पक्षी मृत्यूमुखी पडले आहे. त्यामुळे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या वाऱ्याने पडदा तोडून आतमध्ये पाणी आणि वारे घुसल्याने पक्षी गारठल्याने मरत होत असल्याचे सांगण्यात आले. एक पक्षी ३५ रुपयाला खरेदी केला असून त्यानुसार पंधरा १८ ते २५ रुपयांचे खाद्य आणि औषधे देण्यात आली. परंतु पक्षी वाढत असताना अचानक वादळी वाऱ्याने पाऊस झाल्याने पक्षी गारठून मरत आहे.त्यामुळे अंदाजे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने मला भरपाई द्यावी. – जयसिंगराव एरंडे, पोल्ट्री चालक, कोल्हारवाडी. वेळ नदीला पूर… सातगाव पठार भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. झालेल्या पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. झालेल्या पावसामुळे पेठ पारगाव भागातून जाणाऱ्या वेळ नदीला देखील पूर आला होता.