Pune District : जेजुरीत पाणीप्रश्न भडकण्याची चिन्हे!

चार दिवसाआड पुरवठा : राष्ट्रवादीचे अजित पवारांना निवेदन
जवळार्जुन – जेजुरी (ता. पुरंदर) शरात पाणीसमस्येने उग्ररुप धारण केले असून त्याचा भडका कधीही उडू शकतो. या समस्येसह अनेक विकासकमांसंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मुंबई मंत्रालय येथे जाऊन भेट घेतली असून विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
जेजुरी शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या असून शहरात चार दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज 75 ते 80 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना फक्त 30 ते 35 लाख लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच पाणीपुरवठा करणारी जल वाहिनी जुनी झाली असल्याने अनेक ठिकाणी फुटत असते ती जलवाहिनी नव्याने करणे व नवीन दोन ते तीन पाण्याच्या टाक्या बांधून पाणी साठवण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरुन नागरीकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल.
तसेच शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रिटचे व डांबरीकरण करणे आवश्यक आहे आपण मंजूर केलेल्या 350 कोटी रुपयांच्या जेजुरी गड विकास आराखड्यातील कामे सुरू असून आपण स्वतः या कामाची पाहणी करण्यासाठी जेजुरी शहराला व खंडोबा गडाला भेट द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष तानाजी जगताप, जेजुरी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश लेंडे, जेजुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते रमेश बयास, माजी नगरसेवक दिंगबर उबाळे, राष्ट्रवादीचे विजय खोमणे आदिनी दिले आहे.





