पुणे जिल्हा : राजगुरूनगर आगारात शुकशुकाट

एसटी कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
राजगुरूनगर – एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने मंगळवार (दि. 3) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु झाले आहे राजगुरूनगर एसटी बस आगारामध्ये कामबंद आंदोलन करण्यात आले. कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, कर्मचारी कामगार आणि नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
राज्यातील 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. मंगळवार सकाळी पासूनच संपाला सुरुवात झाली. यावेळी कर्मचार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात प्रामुख्याने एसटी कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत होले, सचिव राजू पवार यांच्यासह दत्तात्रय गभाले, माणिक थिगळे, अमित जगताप, प्रवीण जरांडे, वैशाली कदम, रुपाली व्यवहारे, मनीषा मुळूक, शीतल धोत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने एसटी महामंडळाचे कर्मचारी सहभागी झाले होते. एसटी बस सेवा ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले.
खेड तालुक्यात पश्चिम भागात लालपरी शिवाय नागरिकांना पर्याय नाही त्यामुळे एसटी ने प्रवास करणार्या महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी कर्मचारी, नागरिक जेष्ठ नागरिक यांचे हाल झाले. एकंदरीत एसटी बस कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडून खाजगी वाहन चालकांनी लूट केली जादा आकार लावत वाहतूक केली, मुंबई कडे जाणार्या नागरिकांना सर्वाधिक फटका बसला
संयुक्त कृती समितीने राज्यभर धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानुसार आम्ही आंदोलन सुरु केले. आम्हाला सरकारी कर्मचार्यासारखा पगार मिळावा. 2016 ते 2024 महागाई भत्ता लवकरात लवकर मिळावा. सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली. तशी आम्ही पण तुमच्या लाडकी बहीणी आहोत. आम्ही मुले कुटुंब सोडून काम करीत आहोत मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात.आम्हालाही तुमची लाडकी बहीण होण्यासाठी आवडेल.
– वैशाली कदम, महिला वाहक, राजगुरूनगर आगार
2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करावा सरकारने सर्वाना सातवा वेतन आयोग दिला. सरकारी कर्मचारी म्हणून वेतन दिले तसे आम्ह्लाला पण मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्यात
– अमित जगताप, वाहक, राजगुरूनगर आगार
राज्य सरकारी कर्मचारी म्हणून आम्हाला मान्यता द्यावी. राज्यात विविध क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी वेतनासह चांगले निर्णय घेतले जात आहेत मात्र केवळ एसटी कर्मचार्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत संप मागे घेतला जाणार नाही.
– दत्तात्रय गभाले, एसटी कामगार संयुक्त कृती समिती सदस्य, राजगुरूनगर आगार





