पुणे जिल्हा : शॉर्टसर्किटने तीन एकर ऊस खाक

पिंपरखेडमध्ये ठिबक संच जळाला : आठ लाखांचे नुकसान
जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथील शॉर्टसर्किट होऊन उसाच्या फडाला लागलेल्या आगीत शेतकरी धोंडिभाऊ रामभाऊ उंडे यांचा तीन एकर ऊस आणि दीड लाख रुपयांचे ठिबक जळून खाक झाले. सोमवार (दि.16) दुपारी झालेल्या आगीच्या दुर्घटनेत उंडे यांचे सुमारे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उंडे यांचे हिस्सेदार दशरथ देवराम गावडे यांनी दिली.
यावेळी जळीत झालेल्या उसाची महावितरणचे सहायक अभियंता दीपक देशमुख, गावकामगार तलाठी अमोल ठिगळे, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. आग लागल्यानंतर स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु उन्हाची तीव्रता आणि वाऱ्याच्या वेगापुढे उसाने मोठा पेट घेतल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होते.
जळीत ऊस हा दहा महिन्यांचा असून यासाठी दीड लाख रुपये भांडवली खर्च उभा केला होता. अजून साखर कारखाने चालू झालेले नसल्याने जळीत उसाचे काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुर्घटनेला पूर्णपणे महावितरण जबाबदार असल्याचे गावडे यांनी सांगितले आहे. याबाबत नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पिंपरखेड भागात उसाचे क्षेत्र मोठे असून अनेक उसावरून वीज वाहक तारा गेलेल्या आहेत. त्या तारांमध्ये अनेक ठिकाणी झोळ पडलेले आहेत. जळीत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी ह.भ.प. रामदास गावडे यांनी केली आहे.
पिंपरखेड येथील उसाचे जळीत झालेल्या शेताची पाहणी केली आहे. याबाबत महावितरणने पंचनामा केला आहे. तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविलेला असून महावितरणचे इलक्ट्रिक इन्स्पेक्टर यांच्याकडून पाहणी करून कार्यवाही करण्यात येईल.
– दीपक देशमुख, सहायक अभियंता, महावितरण निरगुडसर.





