पुणे जिल्हा : शिवरायांचे उजवे पाद्य जयपूरहून उद्या येणार

आळेफाट येथे जंगी तयारी – शरद सोनवणे
जुन्नर – श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने किल्ले शिवनेरीच्या उत्तर दिशेकडील गोद्रे (ता. जुन्नर) येथे जगातील सर्वात उंच शिवरायांच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून सोमवारी (दि. 16) शिवरायांचे उजवे पाद्य (पाय) जयपूर येथून आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आगमन होणार असल्याची माहिती माजी आमदार शरद सोनवणे यांनी शनिवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत दिली.
शिवरायांचे हे पाद्य आळेफाटा-पिंपळवंडी-नारायणगाव- ओझर-ओतूर, बनकरफाटा-लेण्याद्री ते जुन्नर शहर येथे मार्गक्रमण करीत शिवभक्तांच्या दर्शनासाठी येणार आहे. शरद सोनवणे म्हणाले की, गोद्रे (ता. जुन्नर) येथे 25 एकर क्षेत्रात उभारण्यात येणार्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प केलेल्या शिवकार्याचे दि. 12 जानेवारी रोजी कोल्हापूर संस्थानचे संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिपूजन केले होते. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेवून केल्या जाणार्या ह्या शिवकार्यातील पाद्य आगमन सोहळा सोमवारी साजरा केला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेत दर्शन फुलपगार, अविनाश करडिले, दीपेश परदेशी, प्रदीप चाळक, विकास राऊत,विक्रम परदेशी आदी उपस्थित होते. सुमारे 50 फूट उंचीच्या 80 फूट-80 फूट लांबी-रुंदी असलेल्या चौथार्यावर शासनाच्या विविध परवानग्या याबरोबरच कामातील क्रमानुसार योग्य तज्ज्ञांचे अहवाल, भौगोलिक दृष्ट्या हवेचा असणारा दाब, स्मारकाची सुरक्षितता लक्षात घेऊन उभारण्यात येणार्या पुतळ्याचा भाग असलेले साडेअठरा फूट लांबी व साडेआठ फूट रुंदी व साडेसात फूट (7.5) उंचीचे सुमारे 4 टन वजनाच्या पाद्याचे आगमन होणार असून याप्रसंगी मोटार रॅली, ढोल-ताशे, अबदाली पेहेराव, भगवे फेटे परिधान करून फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी केली जाणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन शरद सोनवणे यांनी केले आहे.
मालवण पुनरावृत्ती टाळण्यासाठी…
मालवण येथील घटनेचा उल्लेख करताना सोनवणे म्हणाले की, सर्वात उंच स्मारक उभे करताना अनेकांच्या संशयाच्या सुया आमच्या दिशेने आहेत मात्र सुरक्षितेच्या दृष्टीने आम्ही सावध असून काटेकोरपणे, जागरूक राहून जुन्नरला नावलौकिक प्राप्त होणेकामी अंमलबजावणी करणार आहोत. कला संचालनालय विभाग, शासनाचे विविध विभाग यांचे मार्गदर्शन घेतलेले आहे. मूर्तीकार मिंगलेश्वर सिक्वेरा, वास्तुविशारद विनय पाटील, स्टॅचू ऑफ युनिटी उभारण्यात सहभागी झालेले शिल्प अभियंते मोहंमद अन्सारी, प्रकल्प नियंत्रक प्रमुख अमोल पाचपुते, सुदर्शन शिंदे यांच्या माध्यमातून हे कार्य साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.





