पुणे जिल्हा : शिरूर पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून ४ लाख ५१ हजारांचा दंड केला वसूल

शिरुर : शिरूर पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी चार्ज घेताच शहरातील रोड रोमिओ व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी पोलिस वाहतुक शाखेमार्फत वीस दिवसातच तब्बल ४ लाख ५१ हजारांचा दंड वसुल केला आहे.
वसूल करण्यात आलेल्या दंडात १७ बुलेटस्वारांवर सायलेन्सर (फटाके फोडणे) कारवाई केली असून १७ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे.तसेच ट्रिपल सीट असणाऱ्या ७६ वाहन चालकांवर कारवाई करून ७६ हजार यांचा दंड वसूल केला आहे .विना लायसन्स गाडी चालवणाऱ्या १६ जणांवर कारवाई करून ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या 186 जणांवर कारवाई करून १लाख ४९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शिरूर शहरात फोर व्हीलर गाडीला काळा काचा लावून फिरणाऱ्या २९ जणांवर कारवाई करून २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच फॅन्सी नंबर वापरणाऱ्या ९७ जणांवर कारवाई करून ६२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे .शिरूर शहरात नो पार्किंग मध्ये गाड्या पार्क केलेल्या १९० वाहनावर कारवाई करून तब्बल १ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी’पहिले जनसुनवाई मगच कारवाई’ अशी आपल्या कामाची पद्धत असल्याचे सांगितले.
शिरुर शहरातील वाहतुकीचे प्रश्न, विनापरवाना वाहन चालविणे, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, रोडरोमिओ याबाबत प्रथम जनजागृतीवर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रबोधनातून सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा दंडुका उगारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मुली,महिलांची छेडखानी करणाऱ्यांची नुसती माहिती मिळाली तरी दुसऱ्या मिनिटाला त्याच्यावर कारवाई झालेली असेल. छेडछाडीचे प्रकार कुठे घडत असतील तर फक्त पोलिसांपर्यंत माहिती कळवा, त्याचा बंदोबस्त झालेला दिसेल.
शाळा महाविद्यालयांच्या परिसरात दामिनी पथक, निर्भया पथकाबरोबरच नव्याने छेडछाडविरोधी पथक कार्यान्वित करीत असल्याचे केंजळे यांनी सांगितले. शिरूर शहरातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून यापुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे.





