पुणे जिल्हा : शरद पवारांना शिरूर हवेलीकरांची खंबीर साथ

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
शिवस्वराज्य यात्रेची हवेलीतून सुरुवात
वाघोली : देशाचे नेते शरद पवार यांना शिरूरचे खासदार आणि आमदार यांनी खंबीरपणाने साथ दिली आहे. आपली पक्षनिष्ठा सिद्ध करून दाखवली. लोकसभेला निवडून कसा येतो ही भाषा देखील काहींनी केली. कारखाना संकटात आला तरी देखील पवार यांची निष्ठा अशोक पवारांनी सोडली नाही. खासदार अमोल कोल्हे यांना अनेक प्रलोभने दिली तरीदेखील त्यांनी पक्ष सोडला नाही. याच प्रामाणिक निष्ठेला शिरूर हवेलीकरांनी भरभरून साथ देत लोकसभेला शरद पवारांवरील प्रेम मताच्या रूपाने व्यक्त केले. अशीच निष्ठा रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी यापुढील काळात विधानसभेला दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
अष्टापूर (ता. हवेली) येथील शिवशंकर मंगल कार्यालयात शिवस्वराज्य यात्रेच्या हवेली तालुक्यातील शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, दोन वर्षात आमदार, खासदारांच्या ओढाओढीत पवार यांच्या मागे जिल्ह्यातील दोन माणसे ठामपणे उभी राहिली. एक डॉ. अमोल कोल्हे आणि दुसरे आपले आमदार अशोक पवार. चुकीच्या मार्गावर आम्ही जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक साखर कारखान्यांवर मेहरबानी केली गेली, मात्र जे झुकले नाही त्यांना खड्यासारखे बाजूला केले गेले. अशोक बापूंच्या घोडगंगा कारखान्याला संकटात लोटण्याचे काम केले. त्यांना शिक्षा करताना शेतकऱ्यांना देखील शिक्षा केली. मात्र तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, आपले सरकार आले की कारखान्यावरील त्यायोगाने शेतकऱ्यांवरील अडचणी दूर करण्याचे काम आम्ही करू. अशोक बापूंचा पराभव करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. मात्र आपण प्रचंड ताकद त्यांच्या मागे उभी करा की, ते थेट मंत्रीमंडळात जातील आणि या मतदारसंघाचा विकास साधतील. कोणाच्या दाढीला हात लावून नाही तर शरद पवार साहेब त्यांना सन्मानाने बोलावून मंत्रीपद देतील, हा विश्वास आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार अशोक पवार, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माणिकराव गोते, भारती शेवाळे, प्रदीप कंद, सुजाता पवार, सुनील गव्हाणे, प्रकाश म्हस्के, स्वप्निल गायकवाड, संदीप गोते, संजय भोरडे, योगेश शितोळे, सुरेखा भोरडे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीकास्त्र सोडले. मेहबूब शेख यांनी महायुतीच्या सरकारचा खरपूस समाचार घेतले.
घोडगंगाबाबत शरद पवारांनी बाजू मांडली
आमदार अशोक पवार म्हणाले की, जिल्हा परिषदेला एका पैलवानास बांधकाम सभापती केले. काहींना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष पद दिले. त्यांनी पक्षाचे विधानसभेला काम केले नाही. तरीही मी आजपर्यंत पक्षनिष्ठा सोडली नाही. आम्ही हवेली मार्केट कमिटी वेगळी केली. पण हवेली कमिटीमध्ये आता भांडणे सुरू आहेत. मी शरद पवारांचा पाईक आहे. शेवटपर्यंत पाईकच राहणार आहे. घोडगंगा कारखान्यासाठी शरद पवार यांनी दोनवेळा मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कारखान्याची बाजू मांडली आहे.





